Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुराव्यांअभावी 70 दिवसांनंतर जेलमधून सुटका झाली आहे. या प्रकरणी अभिनेत्याला २८ एप्रिलला छत्तीसगढमधून अटक करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यातच अभिनेत्याला या प्रकरणी 70 दिवसांनंतर जामीन मिळाला आहे. त्याच्याविरोधात प्राथमिक दृष्ट्या कोणताही गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. साहिल खान याला तपासासाठी मुंबईला आणण्यात आलं होतं. आता अभिनेत्याला अखेर जामीन मिळाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सत्र न्यायालयाने अभिनेत्यावर प्रथमदर्शनी कोणताही खटला चालवला नसल्याचे सांगितल्यानंतर अभिनेत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. बहुतांश आरोप हे केवळ अनुमानाच्या आधारे करण्यात आले असून त्यांना पुराव्यांचा आधार नाही, असेही वकीलांनी सांगितले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने साहिल खानचा सादर केलेला युक्तिवाद मान्य केला.
अभिनेता साहिल खानला एप्रिल 2024 मध्ये महादेव बेटिंग ॲप प्रकरणी लायन बुक वेबसाईटची जाहिरात केल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्या ॲपचे ज्यांनी जाहिरात केली त्यांच्यापैकी कोणाचेही नाव एफआयआरमध्ये नाही किंवा त्यांना अटक केलेली नाही. हे सर्व आरोप केवळ अनुमानाच्या आधारेच करण्यात आले असून त्यांना पुराव्याचा आधार नाही, असं साहिलचे वकील रिझवान मर्चंट यांनी न्यायालयात सांगितलं.