Sunny Deol (Photo Credits: File Image)

सनी देओलचा (Sunny Deol) आज वाढदिवस. आज बॉलीवूडचा हा ढाई किलोचा हात 63वर्षाचा झाला. त्यानिमित्त एक नजर त्याच्या करियर मधल्या 5 सर्वोत्तम चित्रपटांवर.

1. गदर: एक प्रेम कथा (Gadar: Ek Prem Katha)

2001 साली प्रदर्शित झालेल्या गदरने अवघ्या देशाला वेड लावलं. हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभागावर घडणारी तारा सिंग आणि सकीनाची ही कथा. आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी तारा सिंग कसा पाकिस्तानात जाऊन लढा देऊन आपल्या कुटुंबाला परत हिंदुस्तानात घेऊन येतो, म्हणजे उर्वरित चित्रपट. वास्तविक हा चित्रपट लगान च्या सोबत रिलीज झाला होता. पण दोन्ही चित्रपटांनी कमाईचे नाव नवे विक्रम प्रस्थापित केले. दिग्दर्शक अनिल शर्माचा हा चित्रपट बॉलीवूडच्या इतिहासात आजपर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत येतो.

2. घायल (Ghayal)

1990 साली आलेला सनी देओल आणि राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटत्रयी मधला हा पहिला चित्रपट. या चित्रपटासाठी सनी देओलला विशेष राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. अजय मेहरा आपल्या भावाच्या फसवणुकीचा आणि खुनाचा बदला बलवंत रायच्या विरोधात कसा घेतो याची कथा म्हणजे हा चित्रपट. या चित्रपटाने सनी देओलला सामान्य प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून दिले होते. याचा सिक्वेल 2016 साली आला होता.

3. दामिनी (Damini)

1993 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सनी देओलला 'द सनी देओल' बनवलं. हा चित्रपट मीनाक्षीच्या दामिनी पात्रावर जरी बेतलेला असला आणि सनीच्या ऍडव्होकेट गोविंदची एन्ट्री जरी चित्रपटात काहीशी उशिरा होत असली तरीही त्याने या चित्रपटावर आणि या चित्रपटाने चित्रपटसृष्टीवर सोडलेली छाप ही ऐतिहासिक स्वरूपाची होती. 'ढाई किलों का हाथ' आणि 'तारीख पे तारीख' हे दोन डायलॉग तर आजही प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत.

4. घातक (Ghatak)

1996 साली आलेला हा चित्रपट संतोषी आणि सनी देओलचा एकमेकांसोबतचा शेवटचा चित्रपट. या चित्रपटासाठी आधी कमल हसनच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. पण त्याने माघार घेतल्या कारणाने ही भूमिका सनीकडे गेली. पण या चित्रपटानंतर दोघांमध्ये सर्जनशीलतेवरून झालेल्या वादांमुळे दोघांनीही नंतर एकत्र चित्रपट केला नाही. हे प्रेक्षकांचं दुःख म्हणावं लागेल.

5. बॉर्डर (Border)

1997 साली आलेला जे. पी. दत्ता दिग्दर्शित युद्धाच्या पार्श्वभूमी वरचा हा महत्वाचा असा चित्रपट. 1971 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धावर या चित्रपट होता. हा चित्रपट तुफान चालला होता. गाणी तर आजच्या काळातही हिट आहेत. सनी देओलने कुलदीप सिंग चांदपुरी यांची भूमिका केली होती. 'कल्ट' झालेला हा चित्रपट अजूनही नव्वदीच्या दशकातल्या टॉप 5 चित्रपटांपैकी आहे.