Ola Electric Scooter Scam: ओला स्कूटर घोटाळ्याचा पर्दाफाश; 20 जणांना अटक, देशभरात 1000 हून अधिक लोकांची फसवणूक
Ola Electric Scooter (PC - PTI)

ओला इलेक्ट्रिक स्कूटर घोटाळ्याप्रकरणी (Ola Electric Scooter Scam) दिल्ली पोलिसांनी 20 आरोपींना अटक केली आहे. हे लोक ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी बनावट वेबसाइट तयार करून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यातून 1 हजारांहून अधिक लोक फसवणुकीचे बळी ठरले आहेत. अहवालानुसार, वेबसाईटवर बुकिंग होऊन खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांनी ग्राहकांना सेवा दिली नाही. अशाप्रकारे त्यांनी 5 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

दिल्लीच्या बाह्य उत्तर जिल्ह्याचे पोलीस हे पाटणा, गुरुग्राम आणि बंगळुरूमध्ये छापे टाकत आहेत. या ठिकाणी आरोपींनी आपले कार्यालय उभे केले होते. ओला इलेक्ट्रिकने वर्षभरापूर्वी भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश केला होता. ही स्कूटर तिच्या वैशिष्ट्यांमुळे आणि खूप कमी बुकिंग रक्कमेमुळे खूप लोकप्रिय झाली. मात्र, सायबर गुन्हेगारांनी स्कूटरच्या नावाखाली फसवणुकीचा नवा मार्ग स्वीकारला.

लॉन्चच्या वेळी तुम्ही ही स्कूटर फक्त 499 रुपयांमध्ये बुक करू शकत होता, मात्र, सध्या बुकिंगची रक्कम 999 रुपयांवर गेली आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटीचे बुकिंग आणि डीलरशिपच्या बहाण्याने आरोपींनी 1,000 हून अधिक लोकांना करोडोंची फसवणूक केली. (हेही वाचा: PMV Micro Electric Car: 16 नोव्हेंबरला येणारी छोटी इलेक्ट्रिक कार; 4 तासात होणार पूर्ण चार्ज, 200 KM पर्यंत धावेल)

दरम्यान, ओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारात तीन वेगवेगळ्या स्कूटर लॉन्च केल्या आहेत. त्यापैकी सर्वात महाग स्कूटर OLA S1 Pro आहे, ज्याची किंमत 1,39,999 रुपये आहे. दुसरी स्कूटर OLA S1 आहे, ज्याची किंमत 99,999 रुपये आहे. हे यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आले. तिसरी स्कूटर नुकतीच लाँच झालेली Ola S1 Air आहे, ज्याची किंमत 84,999 रुपये आहे.