
कोविड-19 संकट आणि त्यामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती यातही हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ने फेस्टिव्ह सीजनमध्ये तब्बल 14 लाख गाड्यांची विक्री केली आहे. या विक्रमी यशाची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने गाठलेल्या या मैलाच्या दगडामुळे बाजारातील कंपनीची लीडरशीप अधिक दृढ करण्यासाठी नक्कीच मदत होईल. दुचाकीची विक्री नवरात्री पासून वाढायला सुरुवात झाली. नवरात्रीपासून ते भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत सलग 32 दिवस विक्री चांगली होत होती. या फेस्टिव्ह सीजन खूपच मोठ्या असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीचे प्रमाण 98% वाढले.
2018 शी तुलना केल्यास कंपनीची विक्री 103% वाढली आहे. हिरो दुचाकीच्या देशांतर्गत बाजारातील प्रचंड मागणीमुळे कंपनीकडून सर्व डिलर्संना दिला जाणारा वेटिंग पिरीयड हा कमी करुन 4 आठवडे करण्यात आला. हा आतापर्यंतचा सर्वात कमी वेटिंग पिरीयड असल्याचा दावा करण्यात आला आहे.

100 सीसी स्प्लेंडर+ , एचएफ डिलक्स, 125 सीसी मोटारसायकल ग्लॅमर, सुपर स्प्लेंडर आणि एक्सट्रिम 160 यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सना सणासुदीच्या काळात प्रचंड मागणी होती. त्याचबरोबर Destini आणि Pleasure scooters साठी देखील मोठी मागणी होती. यामुळे विक्रीत दुहेरी वाढ झाली.


कोविड-19 लॉकडाऊननंतर मे च्या सुरूवातीस प्लांट ऑपरेशन पुन्हा सुरू झाले. आणि त्यानंतर रिटेल सेलला सुरुवात झाली. दरम्यान, गेल्या महिन्यात हिरो मोटोकॉर्पच्या मार्केट शेअरमध्ये 500 bps पेक्षा अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे दिवाळी निमित्त हिरोच्या बाईक्स आणि स्कूटर्सवर बंपर सूट दिली जात होती. याचाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नक्कीच फायदा झाला.