E-Bike Blast: सुरतमध्ये ई-बाईकचा स्फोट; 18 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, 4 जण जखमी, रात्रभर चार्जिंगला लावली होती गाडी
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

E-Bike Blast: लोकांमध्ये ई-बाईकबाबत (E-Bike) अजूनही सांशकता आहे. ई-बाईक अपघाताच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. आता सुरतमध्ये (Surat) ई-बाईकचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. सुरतमध्ये शुक्रवारी पहाटे ई-बाईक आणि एलपीजी सिलिंडरच्या स्फोटानंतर एका दोन मजली निवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत एका 18 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून, तिच्या कुटुंबातील चार सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.

लिंबायत येथील लक्ष्मीपार्क सोसायटीत पहाटे साडेपाचच्या सुमारास स्फोट झाला. व्हरांड्यात रात्रभर चार्जिंगसाठी लावलेली इलेक्ट्रिक बाइक हे या स्फोटाचे मुख्य कारण होते. गाडीचा स्फोट झाल्यनंतर शॉर्ट सर्किटने आग लागली व जी वेगाने पसरली आणि त्यानंतर शेजारील एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला. घराच्या पहिल्या मजल्यावर हे कुटुंब झोपले असताना आगीच्या ज्वाळांनी त्यांना वेढले.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन व आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झाले. तासाभरात अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. दुहेरी स्फोटांमुळे भिंती आणि दरवाजांचे मोठे संरचनात्मक नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये एका अठरा वर्षीय मुलीचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तिची आई, वडील आणि भावंडे गंभीर जखमी झाले. गंभीर भाजल्याने कुटुंबातील सदस्यांना त्वरित वैद्यकीय उपचारासाठी स्मिमर रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा: Tata Motors to Hike Prices of Commercial Vehicles: टाटा मोटर्सचा ग्राहकांना मोठा झटका; व्यावसायिक वाहनांच्या किंमतीमध्ये होणार वाढ, 1 जुलैपासून नवे दर लागू)

उपमहापौर नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली, त्यानंतर त्यांनी जखमी कुटुंबाची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी अग्निशमन विभागाच्या तत्पर प्रतिसादाचे कौतुक केले आणि कुटुंबाला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, आधी ई-बाईकमध्ये स्फोट झाला आणि नंतर एलपीजी सिलिंडरला आग लागल्याने भीषण स्फोट झाला. ही आग वरच्या मजल्यावर पसरली जिथे कुटुंब झोपले होते. कुटुंबातील चार सदस्य आगीतून बाहेर पळून जाण्यात यशस्वी झाले, तर 18 वर्षीय मुलगी आगीत अडकली आणि तिचा जळून मृत्यू झाला.