फक्त 'बोअर' होत आहे म्हणून तरुणाने सोडली 3.5 कोटींची नोकरी, जाणून घ्या सविस्तर
Netflix logo (Photo credit: twitter)

सध्याच्या काळात नोकरी मिळणे खूपच अवघड आहे आणि जर का ती मिळालीच तर ती टिकवून ठेवणे कठीण आहे. या सर्वात मनाजोगता पगार मिळेलच याचीही काही शाश्वती नाही. मात्र जगात असेही लोक आहेत ज्यांनी आपल्या कोट्यावधी रुपयांच्या पगावर लाथ मारली आहे. ऐकायला थोडे विचित्र वाटत असेल मात्र हे सत्य आहे. अमेरिकेतील नेटफ्लिक्समध्ये (Netflix) काम करणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या पोस्टचा राजीनामा दिला आहे आणि त्याचा पगार वार्षिक साडेतीन कोटी रुपये असल्याची माहिती आहे. रिपोर्ट्सनुसार, मायकल लिन असे या व्यक्तीचे नाव आहे.

मायकल नेटफ्लिक्समध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. त्याने त्याच्या लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिले आहे की, जेव्हा तो नेटफ्लिक्सच्या टीममध्ये सामील झाला तेव्हा त्याला वाटले होते की, आपण आयुष्यभर याच कंपनीसाठी काम करणार आहोत. मात्र त्याने त्याची नोकरी सोडली. त्याला कंपनीबाबत काही समस्या होती असे नाही. कंपनीमध्ये खाण्या-पिण्याची चंगळ होती, अमर्यादित सुट्ट्यांसह त्याचा पगार $450,000 (साधारण वार्षिक 3.5 कोटी रुपये) होता.

जेव्हा मे 2021 मध्ये लिनने नोकरी सोडली तेव्हा ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या कुटुंबीयांसाठी तर हा मोठा शॉक होता. त्याच्या मेंटरनेही त्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दुसरी नोकरी मिळेपर्यंत ही नोकरी सोडायला नको होती, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Elon Musk Warning: इलॉन मस्कचा इशारा - ट्विटरने फेक-स्पॅम खात्यांचा तपशील दिला नाही तर खरेदी करार रद्द केला जाईल)

हा निर्णय घेणे मायकलसाठी सोपे नव्हते. काम करताना त्याला खूप काही शिकायला मिळाले. पण हळूहळू कोरोनाचा काळ संपल्यानंतर त्याला सर्व कंटाळवाणे वाटू लागले. जणू काही कंपनीने दिलेल्या सर्व सुविधा, एकत्र काम करणारी माणसे आणि इतर सर्व काही अचानक ठप्प झाले आहे. त्याला कामात रस वाटेनासा झाला व फक्त आपल्याला इथे बोअर होत आहे म्हणून त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. नोकरी सोडल्यानंतर तो जवळजवळ आठ महिने लेखक, उद्योजक अशा अनेक लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत होता.