World's First Covid-19 Vaccine for Animals: रशियाने बनवली प्राण्यांसाठीची जगातील पहिली कोरोना विषाणू लस ‘Carnivac-Cov’; एप्रिलपासून सुरु होऊ शकेल उत्पादन
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सध्या जगातील कोट्यावधी लोकांना कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग झाला आहे. या विषाणूमुळे लाखो मृत्यू झाले आहेत. महत्वाचे म्हणजे मुके प्राणीसुद्धा कोरोना विषाणूपासून वाचलेले नाहीत. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा परिणाम जगभरातील पाळीव प्राण्यांवर झाला. सध्या कोरोना विषाणू लसीमुळे हा संसर्ग मानावांपासून काही प्रमाणात दूर राहील अशी आशा निर्माण झाली आहे. दुसरीकडे प्राण्यांसाठीची पहिली कोरोना विषाणू लस (World's First Covid-19 Vaccine for Animals) रशियाकडून (Russia) तयार केली गेली आहे. कृषीविषयक कामांवर देखरेख ठेवणारी संस्था Rosselkhoznadzor  यांनी बुधवारी या संदर्भात घोषणा केली आहे. प्राण्यांसाठी बनवलेल्या या नवीन लसीचे नाव Carnivac-Cov आहे.

रशियामध्ये आधीपासूनच मानवांसाठी बनवलेल्या तीन कोरोना विषाणू लस उपलब्ध आहेत, त्यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे स्पुतनिक व्ही. आता मॉस्कोने EpiVacCorona आणि CoviVac या इतर दोन लसींनाही आपत्कालीन मंजुरी दिली आहे. रशियानंतर अमेरिका आणि फिनलँड देखील प्राण्यांसाठी कोरोना लस बनवत असल्याच्या बातम्या आहेत. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे, पाळीव प्राण्यांमधील कोरोनाचा धोका आणि चिंता वाढत आहे.

प्राण्यांसाठीची कोरोना विषाणू लस Carnivac-Cov, Rosselkhoznadzor च्या एका युनिटने विकसित केली आहे. Rosselkhoznadzor उपप्रमुख Konstantin Savenkov यांनी सांगितले की, या लसीची क्लिनिकल चाचणी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू झाली होती. यात कुत्री, मांजरी, आर्क्टिक कोल्हे, मिंक, कोल्हे आणि इतर प्राणी समाविष्ट होते. (हेही वाचा: Coronavirus: Frozen Food पासून COVID-19 विषाणूची उत्पत्ती? WHO अहवाल काय सांगतोय पाहा)

चाचणीच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की, ही लस प्राण्यांसाठी हानीरहित आणि अत्यंत रोगप्रतिकारक आहे. लसीकरण झालेल्या सर्व प्राण्यांमध्ये कोरोना विषाणूचे प्रतिपिंडे विकसित झाले. साधारण एप्रिलच्या सुरूवातीस लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होऊ शकते. लसीकरणानंतर रोग प्रतिकारशक्ती सहा महिन्यांपर्यंत टिकते, परंतु लसीचे विकसक याबाबतचे विश्लेषण चालू ठेवणार असल्याचे, वॉचडॉगने सांगितले.