Washington: न्यूयॉर्कमध्ये 'भारत दिन' निमित्त दाखवण्यात येणार राम मंदिराची प्रतिकृती, 18 फूट असणार लांब
Ayodhya Ram Mandir (File Photo)

Washington: 18 ऑगस्ट रोजी 'भारत दिना'निमित्त न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या परेडमध्ये राम मंदिराची प्रतिकृती दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात न्यूयॉर्क आणि आसपासचे हजारो भारतीय अमेरिकन सहभागी होणार आहेत. विश्व हिंदू परिषद अमेरिका (VHP) चे सरचिटणीस अमिताभ मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराची प्रतिकृती १८ फूट लांब, नऊ फूट रुंद आणि आठ फूट उंच असेल. अमेरिकेत पहिल्यांदाच राम मंदिराची प्रतिकृती प्रदर्शित होणार आहे.

न्यूयॉर्कमध्ये दरवर्षी 'इंडिया डे'ला होणारी ही परेड स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताबाहेरील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. मिडटाऊन न्यूयॉर्कमधील 'ईस्ट 38व्या स्ट्रीट' ते 'ईस्ट 27व्या स्ट्रीट'पर्यंत दरवर्षी ही परेड काढली जाते, ज्याला 1,50,000 हून अधिक लोक भेट देतात. 'फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन' (एफआयए) ने आयोजित केलेल्या या परेडमध्ये विविध भारतीय अमेरिकन समुदायांची विविधता आणि त्यांच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक गोष्टी  न्यूयॉर्कच्या रस्त्यावर पाहायला मिळतील.