US President Donald Trump (Photo Credits: Getty Images)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला ग्रासले आहे. परंतु, कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्यांची संख्या आणि मृतांचा आकडा हा अमेरिकेत (America) सर्वाधिक आहे. अमेरिकत तब्बल 17 लाख लोकांना कोविड-19 (Covid-19) ची बाधा झाली असून 1 लाखाहून अधिक रुग्णांनी प्राण गमावले आहेत. कोविड-19 हा व्हायरस चीनच्या (China) वुहान (Wuhan) शहरातून जगभर पसरला. मात्र जागितक आरोग्य संघटनेने (World Health Organization) चीनमधील कोरोनाच्या प्रसाराबद्दलची माहिती झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी जागतिक आरोग्य संघटनेसोबतच्या अमेरिकच्या संबंधांना पूर्णविराम दिला आहे.

चीन WHO ला वर्षाला केवळ 40 मिलियन डॉलर्स देत असून अमेरिका तब्बल 450 मिलियन डॉलर्सचे फंडींग वर्षाला करतं. तरी देखील जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचे पूर्णपणे नियंत्रण असून चीनच्या इशाऱ्यावर WHO काम करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यास जागतिक आरोग्य संघटना असमर्थ ठरल्याने WHO बरोबरचे सर्व संबंध तोडत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर WHO ला अमेरिकेकडून मिळणारे फंडींग देखील रोखण्यात आले. WHO चीनच्या इशाऱ्यांवर काम करत असल्याने जगावर कोरोना व्हायरसचे गंभीर संकट ओढावले आहे. तसंच कोविड-19 या साथीचा प्रसार रोखण्यास जागतिक आरोग्य संघटना अयशस्वी ठरली आहे. WHO ने वेळीच योग्य पाऊले उचलली असती तर आज जगभरात वेगळी स्थिती असती, असेही ट्रम्प म्हणाले. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले सर्व आरोप जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळून लावले आहेत.