Coronavirus Outbreak: अमेरिकेमध्ये दिवसभरात 865 जणांचा मृत्यू; आत्तापर्यंत सर्वाधिक बळींचा उच्चांक
Coronavirus | Photo Credits: Unsplash

चीन, इटली नंतर आता जगातील महासत्ता असणार्‍या अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यूचं तांडव सुरू झालं आहे. Johns Hopkins University च्या अहवालानुसार, मंगळवार 31 मार्चला अवघ्या 24 तासामध्ये सुमारे 865 जणांचा बळी गेला आहे. हा एका दिवसात अमेरिकेमध्ये बळी घेणार्‍यांचा सर्वाधिक आकडा आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पुढील 2 आठवडे देशासाठी अत्यंत वेदनादायी असतील आणि त्यासाठी प्रत्येक अमेरिकन नागरिकाने तयार रहावं असं देखील ते म्हणाले. सध्या अमेरिकेमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 188530 च्या पार गेला आहे. तर Covid 19 या आजाराने सुमारे 3800 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला. अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे सुमारे 1 ते अडीच लाख बळी जाऊ शकतात असा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला आहे.

अमेरिकेत प्रामुख्याने न्यूयॉर्क, न्यूजर्सी या भागात कोरोनाबधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे देशभरात 30 एप्रिल पर्यंत नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग पाळावं असे आदेश देण्यात आले आहे. मात्र संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यास अद्याप राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प तयार नाहीत. देशातील काही निवडक भागामध्येच लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. Coronavirus: CNN निवेदक Christopher Cuomo  यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह.

ANI Tweet

सध्या जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 858,669 पर्यंत पोहचला आहे. तर 42,000 हून अधिक बळी गेले आहेत. चीनमधून जगभर पसरलेला कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत असल्याने सुमारे जगातील 25% देश सध्या लॉकडाऊन आहेत. त्याचा आरोग्य क्षेत्रासोबतच जगाला मोठा आर्थिक फटकादेखील बसत आहे. येत्या काही काळात मोठ्या जागतिक आर्थिक मंदीलादेखील तोंड द्यावे लागणार असल्याचं सांगण्यात आले आहे.