सुरक्षा परिषदेने केली पाकिस्तानची निंदा; हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताला परवानगी, इतर देशही करणार मदत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

14 फेबुवारीला पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याची (Pulwama attack) जगभरातून निंदा केली जात आहे. या हल्ल्यात तब्बल 40 पेक्षा जास्त जवान मारले गेले होते, ज्याचे पडसाद फक्त भारतातच नाही तर आता जगभरातही उमटले असल्याचे दिसत आहे. या हल्ल्याबाबत संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषद (United Nations Security Council) नेही एक स्टेटमेंट जारी केले आहे, ज्यामध्ये ही घटना सामाजिक शांतता भंग करणारी आहे असे म्हंटले आहे. तसेच या हल्ल्याचा बदला घेण्याची परवानगी भारताला देण्यात आली आहे, यासाठी इतर देशांनी भारताला सहकार्य करावे असेही म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांनी यावेळी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसहित भारतीय जनता आणि सरकारप्रती सहानुभूती व्यक्त केली.

संयुक्त राष्ट्राच्या सर्वात महत्वाच्या 15 देशांनी पाकिस्तानची निंदा करत, पाकिस्तानने थारा दिलेल्या दहशतवादी संघटनांचा उल्लेखही केला आहे. सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांतता यासाठी दहशतवाद एक गंभीर धोका आहे. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्याचे षडयंत्र रचणारे, त्यांना मदत करणारे तसेच त्यांचे समर्थन करणारे यांविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे. यूएनएससीने हा हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांना कठोर कारवाई करण्यासाठी, या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इतर राष्ट्रांनी भारताला सर्वोतोपरी सहकार्य करावे असे सांगितले आहे. (हेही वाचा : वाईट काळ सुरु; वर्ल्डकपमधून पाकिस्तान टीम बाहेर काढण्यास भारताचे प्रयत्न, BCCI ने लिहिले पत्र)

या परिषदेमध्ये चीनलादेखील झटका बसला आहे. जैश सरगना मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीन आडकाठी करत होता, त्यामुळे चीनलादेखील फैलावर घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारताने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानची कोंडी करायची या उद्देशाने आता भारत सरकारने सिंधू जल वाटपानंतरही आतापर्यंत पाकला दिले जाणारे व्यास, रावी आणि सतलज नदीचे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. या तीनही नद्यांचे पाणी आता पंजाब आणि जम्मू काश्मीरमधील माद्यांमध्ये वळवले जाणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली.