वाईट काळ सुरु; वर्ल्डकपमधून पाकिस्तान टीम बाहेर काढण्यास भारताचे प्रयत्न, BCCI ने लिहिले पत्र
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo: IANS)

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात (Pulwama Attack) भारताला 40 पेक्षा जास्त जवान गमवावे लागले. या घटनेमुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. केंद्र सरकार यावर पावले उचलतच आहे, मात्र याचे पडसाद क्रिकेट विश्वातही उमटले आहेत. म्हणूनच पाकिस्तानला येत्या वर्ल्डकपमधून बाहेर काढण्यासाठी भारताने प्रयत्न सुरु केले आहेत. बीसीसीआय (BCCI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC)ला एक पत्र लिहून पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये खेळायला देऊ नका अशी मागणी केली आहे. 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत आयसीसीची एक महत्वाची बैठक दुबई येथे होणार आहे, या बैठकीत पाकिस्तानला वर्ल्डकप खेळू न देण्याचा मुद्दा भारत मांडणार आहे.

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान सहभागी होईल का नाही यावर लवकरच निर्णय होईल, मात्र बीसीसीआय या संदर्भात सरकारची भूमिका मानण्याचे निश्‍चित केले आहे. सरकारने जर पाकिस्तानविरुद्ध खेळू नये असे सांगितले, तर आम्ही खेळणार नाही असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हरभजन सिंग, सौरव गांगुली, चेतन चौहान, गौतम गंभीर आणि मोहम्मद मोहम्मद अझरुद्दीन यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याची मागणी केली होती. (हेही वाचा: ‘अखिल भारतीय सिने कामगार संघटने’कडून पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी)

14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त भारताने जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानची गळचेपी करण्यास सुरुवात केलीं आहे. केंद्र सरकारने आयात कर वाढवला, चित्रपटसृष्टीने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. त्यानंतर आता पाकिस्तानच्या क्रिकेट टीमसोबत खेळू नये अशी मागणी होऊ लागली आहे, लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. दरम्यान, इंग्लड आणि वेल्स येथे 30 मे पासून वर्ल्डकप स्पर्धांना सुरुवात होणार आहे, आणि 16 जूनला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.