
Flight Attendant's News: यूएस येथील एका विमान कंपनीविरोधात ( United Airlines) वर्णभेदाचा आरोप करण्यात आला आहे. ही विमान कंपनी व्यावासायिक आणि महाविद्यालयीन क्रीडा संघांना सेवा देताना केवळ विशिष्ट आणि खास वयोगटातील तरुण महिला फ्लाईट अटेंडंटन्सना प्राधान्य (Discrimination) देते असा आरोप असून त्याविरोधात खटलाही दाखल झाला आहे. लॉस एंजिलीस टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन महिला फ्लाईट अटेंडंट्सनी विमान कंपनीच्या या व्यवहाराविरोधात खटला दाखल केला आहे. ज्यात म्हटले आहे की, त्यांना लॉस एजेलिस डॉजर्स बेसबोल संघासाठी चार्टर फ्लाइट्सवर काम करण्यासाठी शिफारस नाकारण्यात आली. त्याचे कारण इतकेच की त्या गोऱ्या आणि सडपातळ नाहीत. तसेच, त्यांचे डोळे निळे नाहीत. सडपातळ, गोऱ्या आणि निळ्या डोळ्यांच्याच फ्लाईट अटेंटंड्सना खेळाडू पसंत करतात असाही काहींचा समज असल्याचा दावा या खटल्यात करण्यात आला आहे.
डॉन टॉड (वय 50) आणि डार्बी क्वेझाडा (वय 44) असे खटला दाखल केलेल्या महिला फ्लाईट अटेंडंट्सचे नाव आहे. त्यांनी म्टले आहे की, तरुण आणि सडपातळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकाऱ्यांच्या तुलनेत त्यांना सुरुवातीला दुर्लक्षीत करण्यात आले आणि पुढे वगळण्यात आले. लॉस एंजेलिस काउंटी सुपीरियर कोर्टात 25 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या खटल्यात, दोन्ही महिलांनी युनायटेडच्या चार्टर फ्लाइट्सच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वंश, राष्ट्रीय मूळ, धर्म आणि वय यावर आधारित छळ आणि/किंवा भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.
लॉस एंजलिस टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, टॉड आणि क्वेझाडा या दोन्ही महिलांन फ्लाईट अटेंडंड्स म्हणून 15 वर्षांहून अधिक काळ काम करण्याचा अनुभव आहे. त्यांचा एकूण कार्यकाळ आणि अनुभव पाहता त्यांना कामाच्या बाबतीत वरिष्ठत्व प्राप्त झाले आहे. परिणामी त्यांना जर कामासाठी शिफारस करायचे तर फ्लाईटमध्ये प्रवासी सेवा देण्याचा वेळ आणि इतर भत्त्यांमुळे ठराविक असाइनमेंटच्या तिप्पट भरपाई मिळू शकते. खटल्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आमच्याकडे आवश्यक अनुभव आणि पात्रता आहे. असे असतानाही आम्हाला संधी नाकारण्यात आली कारण आम्ही गोरे नाही आहोत.
युनायटेड एअरलाइन्सने यापूर्वी 2020 मध्ये एक खटला निकाली काढला होता ज्यात एअरलाइनवर विशिष्ट प्रोफाइलमध्ये बसणाऱ्या अटेंडंटसह फ्लाइटमध्ये कर्मचारी नियुक्त केल्याचा आरोप केला होता. ज्याचे वर्णन "तरुण, गोरी, महिला आणि प्रामुख्याने सोनेरी किंवा निळे डोळे" असे केले जाते. या 2020 सेटलमेंटच्या आधारावर आता नवीन खटला दाखल केला गेला आहे.