Umrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट
Muslim pilgrims are seen around the Kaaba at the Grand Mosque in Mecca, Saudi Arabia | File Pic | Photo Credit: IANS

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमुळे जगातील अनेक प्रेक्षणीय स्थळे, प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये मुस्लीम धर्मियांच्या प्रसिध्द मक्केचाही (Mecca) समावेश आहे. आता सौदी अरेबियाने (Saudi Arabia) ‘उमरा’वरील (Umrah Pilgrimage) काही निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली असून, ते पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे उमरासाठी गेल्या सात महिन्यांपासून बंदी आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात केवळ सौदी अरेबियातील लोकांनाच उमरासाठी परवानगी दिली जाईल. उमरा पूर्वीसारखा तेव्हाच सुरु होईल जेव्हा कोरोना विषाणूचा पूर्णपणे नाश होईल.

सौदी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशात राहणाऱ्या लोकांना 4 ऑक्टोबरपासून उमरा करण्यास परवानगी देण्यात येणार आहे, तर निवडक देशांच्या नागरिकांना 1 नोव्हेंबरपासून यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. एका दिवसात येणार्‍या लोकांची संख्या 6 हजार असेल. दुसरा टप्पा 18 ऑक्टोबरपासून सुरू होईल. दुसर्‍या टप्प्यातही केवळ सौदी अरेबियातील लोकांनाच मशिदीत प्रवेश मिळेल, परंतु यावेळी एकूण 65 हजार लोकांना मशिदीत येण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

सौदी अरेबियाच्या अंतर्गत मंत्रालयाने म्हटले आहे की, तिसऱ्या टप्प्यात सौदी अरेबियाबाहेर राहणाऱ्या लोकांनाही 1 नोव्हेंबरपासून उमरात येण्याची परवानगी देण्यात येईल. या दरम्यान, एका दिवसात एकूण 80 हजार लोकांना इथे येण्याची परवानगी दिली जाऊ शकते. उमराची इच्छा असणाऱ्या लोकांना तारीख व वेळ देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अशा लोकांसाठी एक खास अ‍ॅपही तयार केले गेले आहे, ज्यात त्यांना विशेष परिवहन निवडण्याचा पर्याय असेल.

सौदी अरेबिया सरकारचे म्हणणे आहे की, ते कोरोनाशी संबंधित त्यांची मार्गदर्शक तत्त्वे आणि घडामोडींचे मूल्यांकन करत राहतील. जुलैमध्ये सौदी अरेबियाने फारच कमी लोकांसह हज आयोजित केले होते. साधारणत: जिथे दरवर्षी 20 लाख लोक हजमध्ये भाग घेतात, यावेळी फक्त 1000 लोक येथे पोहोचले. (हेही वाचा: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध)

दरम्यान, दरवर्षी जगभरातील लाखो मुस्लिम बांधव वर्षभर उमराहसाठी मक्का येथे जातात. वर्षातून एकदा होणार्‍या हजपेक्षा उमरा पूर्णपणे वेगळा आहे. वर्षातील कोणत्याही महिन्यात करता येणारी उमराह एक सुन्नत काम आहे. परंतु यावर्षी हज बरोबरच उमरा येथेही बंदी घातली होती.