तुर्कस्तान (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) रविवारी रात्री शक्तिशाली भूकंप (Earthquakes) झाला. त्यानंतर सोमवारीही भूकंपाचे दोन जोरदार धक्के जाणवले. सोमवारी झालेल्या दोन भूकंपाची तीव्रता 7.6 आणि 6 एवढी होती. अशा प्रकारे गेल्या 24 तासांत तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या तीन शक्तिशाली भूकंप झाले, ज्यामुळे आतापर्यंत 2300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे शेकडो इमारती कोसळल्या आहेत. ज्यामध्ये 2300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत.
माहितीनुसार सर्वप्रथम रविवारी रात्री 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर सोमवारी दोन भूकंप झाले. या भूकंपांची तीव्रता इतकी जास्त होती की, क्षणार्धात अनेक इमारती कोसळल्या. भूकंप इतके तीव्र होते की, त्याचे परिणाम सीरिया, लेबनॉन आणि इस्रायलमध्येही जाणवले. तुर्कीमधील सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये राजधानी अंकारा, नुरदगीसह 10 शहरे आहेत.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू गॅझियानटेपपासून सुमारे 33 किलोमीटर (20 मैल) आणि नूरदगी शहरापासून सुमारे 26 किलोमीटर (16 मैल) अंतरावर होता. हे 18 किलोमीटर (11 मैल) खोलीवर केंद्रित होते. अधिकृतरीत्या मृतांचा आकाधा 2300 वर पोहोचला असला तरी, तो वाढण्याची अपेक्षा आहे कारण बचावकर्ते अजूनही बाधित भागात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत.
#UPDATE | More than 2,300 people killed so far due to deadly earthquakes in Turkey and Syria, reports The Associated Press #Turkey was hit by three consecutive devastating earthquakes of magnitude 7.8, 7.6 & 6.0.#TurkeyEarthquake pic.twitter.com/9HXMHf6usv
— ANI (@ANI) February 6, 2023
तुर्कीमधील या भीषण नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी भारत सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. या संकटाच्या काळात तुर्कस्तानला मदत करण्यास तयार असल्याचे भारताने सोमवारी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणांसह 100 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली दोन एनडीआरएफ पथके भूकंपग्रस्त तुर्कीला जाण्यासाठी सज्ज आहेत.
आवश्यक औषधांसह प्रशिक्षित डॉक्टर आणि पॅरामेडिक्ससह वैद्यकीय पथकेही तयार केली जात आहेत. तुर्की सरकार आणि अंकारा येथील भारतीय दूतावास आणि इस्तंबूलमधील वाणिज्य दूतावास कार्यालय यांच्या समन्वयाने मदत सामग्री पाठवली जाईल. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तुर्कस्तानमधील भूकंपाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिल्यानंतर पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांनी साऊथ ब्लॉक येथे तातडीने मदत उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यामध्ये मदत सामग्रीसह एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके तातडीने तुर्कीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा: तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपाचा व्हिडिओ आला समोर, पत्त्यांसारखी कोसळली इमारत)
सततच्या बर्फवृष्टीमुळे प्रमुख रस्ते बर्फाने झाकले आहेत, त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहे. अधिकार्यांनी सांगितले की भूकंपामुळे या प्रदेशातील तीन प्रमुख विमानतळ अक्षम झाले आहेत, ज्यामुळे अत्यावश्यक मदत पोहोचवणे अधिक कठीण झाले आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, 10 शहरांमध्ये 1,700 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले आहे. त्याच वेळी, सीरियामध्ये किमान 783 लोक मारले गेले आणि 639 जखमी झाले. इस्रायल आणि लेबनॉनमध्येही अनेक मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.