Top 150 Most Legendary Restaurants: प्रसिद्ध झाली जगातील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट्सची यादी; भारतातील 7 ठिकाणांचा समावेश, घ्या जाणून
The Figlmüller (संग्रहित संपादित प्रतिमा)

नुकतेच जगातील 150 प्रसिद्ध रेस्टॉरंटची यादी (Top 150 Most Legendary Restaurants in the World) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील अनेक नावांचा समावेश आहे. ट्रॅव्हल ऑनलाइन गाइड टेस्ट अॅटलसने (Taste Atlas) ही यादी प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या मते हे फूड जॉइंट्स फक्त जेवणासाठीच योग्य ठिकाणे नाहीत, तर जगातील सर्वात प्रसिद्ध संग्रहालये, गॅलरी आणि स्मारकांशी देखील त्यांची तुलना केली जाऊ शकते. या यादीत ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामधील फिगलम्युलर (Figlmüller) ला पहिले स्थान प्राप्त झाले आहे.

यानंतर अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कॅटज डेलिकेटसनचे (Katz’s Delicatessen) नाव येते. इंडोनेशियातील सनूर येथील वारुंग माक (Warung Mak Beng) तिसऱ्या स्थानावर आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, भारतातील सात रेस्टॉरंट्सनी जगातील 150 प्रसिद्ध रेस्टॉरंट्सच्या यादीत स्थान मिळवले आहे.

कोझिकोडमधील ऐतिहासिक पॅरागॉन रेस्टॉरंटला (Paragon Restaurant) जगातील 11 वे सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट म्हणून घोषित करण्यात आले आहे. इथल्या बिर्याणीचे वर्णन ‘सर्वात प्रतिष्ठित डिश’ म्हणून केले गेले आहे. या रेस्टॉरंटची स्थापना 1939 मध्ये झाली होती. रेस्टॉरंटमध्ये मुख्यत्वे स्थानिक उत्पादने आणि स्वयंपाकाच्या पारंपारिक पद्धतींचा वापर केला जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by TasteAtlas (@tasteatlas)

यादीत 12व्या स्थानावर लखनौचे टुंडे कबाबी (Tunday Kababi) आहे. हे त्याच्या मुघलाई पाककृतीसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. येथील गलोटी कबाब खूप प्रसिद्ध आहेत. कोलकाताचे पीटर कॅट, हरियाणाच्या मूरथल येथील अमरिक सुखदेव ढाबा (Amrik Sukhdev Dhaba), बंगळुरूचा मावळी टिफिन रूम (Mavali Tiffin Rooms), दिल्लीचा करीम आणि मुंबईचा राम आश्रय (Ram Ashraya) अनुक्रमे 17व्या, 23व्या, 39व्या, 87व्या आणि 112 व्या स्थानावर आहे. (हेही वाचा: 4,000-Year-Old Burial Ground: नेदरलँड्स येथे आढळली चार हजार वर्षांपूर्वीची दफनभूमी, पुरातत्वशास्त्रज्ञांची माहिती)

या यादीत अनेक अशा रेस्टॉरंट्सचाही समावेश आहे, ज्यांची सुरुवात अगदी छोट्या स्तरावरून झाली होती. हे असे फूड जॉइंट्स आहेत, ज्यांनी स्वतःला सतत बदलत्या संस्कृतीशी जुळवून घेतले आहे. या रेस्टॉरंट्समध्ये तुम्हाला शोबिझपेक्षा खाद्यपदार्थांवर अधिक लक्ष दिले जात असलेले दिसून येईल. प्रामाणिकपणे उत्तम अन्न पुरवणे हे त्यांचे प्राधान्य आहे.