Photo Credit- संग्रहित-संपादित प्रतिमा

एप्रिल 1912 साली अटलांटिक महासागरामध्ये टायटॅनिक (Titanic) जहाजाचा झालेला अपघात जग अजूनही विसरले नाही. एकूण 2,227 प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी 1,517 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो. आता टायटॅनिक जहाज पुन्हा एकदा समुद्राच्या निळ्या पाण्यावर धावताना दिसणार आहे. होय, पुन्हा एकदा ते जहाज समुद्राच्या लाटांवर तरंगताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियन अब्जाधीश क्लाइव्ह पामर यांनी टायटॅनिक-2 (Titanic II) प्रकल्प सुरू केला आहे.

त्यावेळी महासागरात बुडालेल्या महाकाय जहाजाची प्रत तयार करणार असल्याचे क्लाइव्हने यांनी जाहीर केले आहे. क्लाइव्ह यांच्या ब्लू स्टार लाइन कंपनीने हिंमत एकवटली आहे आणि अपूर्ण राहिलेला तो प्रवास पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. क्लाइव्ह यांनी 2012 मध्ये आणि पुन्हा 2018 मध्ये टायटॅनिक-II प्रकल्प सुरू केला होता आणि आता पुन्हा एकदा हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. बुधवारी सिडनीच्या ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शहरातील प्रसिद्ध बंदरात उभ्या असलेल्या जहाजाचे मॉडेल ॲनिमेशन चित्रपट आणि स्क्रीनशॉट्सच्या माध्यमातून जगासमोर मांडण्यात आले.

पत्रकार परिषदेत पामरच्या टीमने अनेक वर्षांपूर्वी बनवलेला 8 मिनिटांचा व्हिडिओही दाखवला. जहाजाचा लेआउट या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. 2025 मध्ये हे जहाज जगाला समर्पित करण्यासाठी बांधकाम कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आल्याचा दावा पामर यांनी केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायटॅनिक II सुमारे 269 मीटर (833 फूट) लांब आणि 32.2 मीटर (105 फूट) रुंद असेल, जो मूळ टायटॅनिकपेक्षा थोडासा रुंद आणि मोठा असेल.

पहा व्हिडिओ-

यामध्ये 835 केबिन आणि 9 डेक असतील. यामध्ये सुमारे 2400 लोकांना प्रवास करता येणार आहे. पहिले दोन डेक राखीव असतील, बाकीचे सर्व सामान्यांसाठी खुले असतील. तिसऱ्या डेकवर किचन आणि डायनिंग हॉल, रेस्टॉरंट, बार, सिनेमा हॉल आणि थिएटर असेल. द मिररच्या रिपोर्टनुसार, पहिल्या टायटॅनिकला श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने टायटॅनिक-2 बनवण्यात आले आहे. ब्लू स्टार लाइनने जहाजाचा आतील भाग जुन्या जहाजासारखाच असावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आतमध्ये लाकडी पायऱ्या आणि सर्व फर्निचर पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. जुन्या टायटॅनिकची अनुभूती मिळावी म्हणून अनेक जण या जहाजाच्या प्रक्षेपणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (हेही वाचा: Japan Rocket Blast: जपानी रॉकेटचा प्रक्षेपणानंतर अवघ्या 5 सेकंदात स्फोट; घटना कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ)

दरम्यान, 10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक, त्याच्या काळातील सर्वात मोठे जहाज आपल्या पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला निघाले. त्याचे बांधकाम 1909 मध्ये सुरू झाले आणि ते 1912 मध्ये पूर्ण झाले. 14-15 एप्रिलच्या रात्री प्रवास सुरू केल्यानंतर चौथ्या दिवशी टायटॅनिक अटलांटिक महासागरातील बर्फाच्या डोंगरावर आदळले. यानंतर त्याचे दोन तुकडे झाले आणि ते समुद्रात बुडाले.