One Day One Toilet: चीनमधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी बनवला विचित्र नियम; एकापेक्षा अधिकवेळा टॉयलेटचा वापर केल्यास भरावा लागेल दंड
Photo Credit : Pixabay

चीनमधील एका कंपनीचे धोरण सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विचित्र नियम बनवला आहे. या नियमानुसार कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये असताना केवळ एकदाच टॉयलेटचा (One Day One Toilet) वापर करता येणार आहे. एवढेच नव्हेतर, एकापेक्षा जास्त वेळा ऑफिसमधील टॉयलेटचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दंड आकारला जाणार आहे. चीन मधील अन्पू इलेक्ट्रॉनिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Anpu Electric Science and Technology) या कंपनीने हा नियम बनवला आहे. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा नियम तयार करण्यात आला आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने जारी केलेल्या नव्या नियमाअंतर्गत एकापेक्षा जास्त वेळा ऑफिसमधील टॉयलेटचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक फेरीसाठी 20 युआन म्हणजेच 3 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 220 रुपये दंड केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20 आणि 21 डिसेंबर रोजी या कंपनीतील सात कर्मचाऱ्यांकडून दंड आकारला गेला आहे. यानंतर या कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तर, काहींनी या नियमाचा विरोध केला आहे. हे देखील वाचा- World's Most Powerful Passports 2021: जपान ठरला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट, तब्बल 191 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास; जाणून घ्या भारताचे स्थान

हा नियम चार्ली चॅपलिनच्या मॉडर्न टाइम्सच्या लोकप्रिय चित्रपटाशी जोडला जात आहे. या चित्रपटात कर्मचाऱ्यांना टॉयलेटमध्ये जाण्याअगोदर आपल्या बॉसकडे नोंदणी करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, या नियमांत सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या नियमांचे उल्लंघन केल्याच्या दंडाची आता दोंगगुआन प्रशासनाने दखल घेतली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.