यापूर्वी कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी आता या विषाणूवर मात केली आहे. त्यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला व त्यानंतर त्यांनी आपले पहिले जाहीर भाषण दिले. यावेळी शेकडो रिपब्लिकन समर्थक व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनवर जमले जोते ज्यांना राष्ट्रपतींनी आपल्या बाल्कनीतून संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, ‘मला खूप बरे वाटले आहे आणि तुमच्या प्रार्थनांसाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो.’ कोरोना विषाणूपासून बरे झाल्यानंतर व्हाइट हाऊसमध्ये परत आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी मेळाव्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी प्रचार करणार्या पथकाने या मोर्च्यांसाठी तयारी सुरू केली आहे.
आपण निरोगी आणि ऊर्जावान असल्याचे सांगत ट्रम्प म्हणाले, ‘मला छान वाटत आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे. घरा बाहेर पडा आणि मला मतदान करा. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो.' गेल्याच आठवड्यात, 74 वर्षीय ट्रम्प आणि त्यांची 50 वर्षीय पत्नी मेलेनियाची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते व तिथून 4 दिवस उपचार घेतल्यानंतर ते सोमवारी परत आले.
एएनआय ट्वीट -
I am feeling great... I want to thank all of you for your prayers: US President Donald Trump to supporters from the White House balcony in his first public event since his COVID-19 diagnosis pic.twitter.com/Q8CbzjqEKn
— ANI (@ANI) October 10, 2020
आपल्या पहिल्या जाहीर भाषणात ट्रम्प म्हणाले, ‘आम्हाला फ्लोरिडा, उत्तर कॅरोलिना आणि नेवाडा येथे उत्तम पोल मिळाले आहे. जॉर्जिया आणि टेक्साससुद्धा पोलमध्ये आम्हाला अनुकूल दिसत आहेत. आम्हाला पूर्वीसारखा पाठिंबा मिळत आहे. मला वाटते की आम्हाला आणखी 4 वर्षे मिळतील.’ (हेही वाचा: अमेरिकेमध्ये Coronavirus मुळे 10 हजार Mink चा मृत्यू; मानवांकडून प्राण्यांमध्ये संक्रमण झाल्याची पुष्टी?)
त्यांची प्रचार मोहीम हाताळणार्या पथकाच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प सोमवारी फ्लोरिडामध्ये पहिल्या मेळाव्यानंतर मंगळवारी पेनसिल्व्हेनियामध्ये मोर्चा काढतील. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतरही ट्रम्प त्यांच्या समर्थकांशी सतत संपर्कात राहत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्यातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीची दुसरी चर्चा अधिकृतपणे रद्द झाली आहे. ट्रम्प यांनी डिजिटल चर्चेला नकार दिल्यानंतर अध्यक्षीय चर्चेशी संबंधित कमिशनने ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता या दोघांमधील तिसरा आणि अंतिम वादविवाद 22 ऑक्टोबर रोजी टेनेसीच्या नॅशविले येथे होईल.