अमेरिकेमध्ये Coronavirus मुळे 10 हजार Mink चा मृत्यू; मानवांकडून प्राण्यांमध्ये संक्रमण झाल्याची पुष्टी?
Mink (Photo Credits: Pixabay)

चीनच्या वूहान शहरामधून सुरु झालेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) जगभरात हाहाकार माजवला आहे. एकीकडे सर्व देश या विषाणूशी सामना करत आहेत तर दुसरीकडे एक नवी समस्या उभी राहिली आहे. अमेरिकेच्या उटाह (Utah) आणि  विस्कॉन्सिन (Wisconsin) मध्ये तब्बल दहा हजार मिंक (Mink) मरण पावले आहेत. मानवांकडून मिंकमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. उटाहमध्ये जवळजवळ 8 हजार व व्हिस्कोन्सिन मध्ये दोन हजार मिंकचा मृत्यू झाला आहे. मिंक हे आकाराने लहान असलेले प्राणी असतात ज्यांच्या शरीरावर रेशमी केस असतात.

उटाहमध्ये पशुवैद्य डीन टेलर म्हणाले की, या दोन प्रांतातील प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरसची पहिली घटना ऑगस्टमध्ये समोर आली होती. येथे जुलै महिन्यात पहिल्यांदाच फार्म वर्कर्सना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला व त्यानंतर तो प्राण्यांमध्येही पसरला. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, बर्‍याच प्राण्यांना कोरोना विषाणूचा धोका आहे. नॅशनल वेटरनरी सर्व्हिसेस लॅबने कुत्री, मांजरी, सिंह आणि वाघ यांसारख्या डझनभर इतर प्राण्यांमध्ये कोरोना विषाणूची नोंद केली आहे. (हेही वाचा: Coronavirus in New Zealand: न्यूझीलंडने दुसऱ्यांदा केली कोरोना विषाणूवर मात; पंतप्रधान Jacinda Ardern ने हटवले लॉक डाऊनने निर्बंध)

हे संशोधन वैज्ञानिक अहवालात प्रसिद्ध झाले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की लोकांच्या संपर्कात राहणारे 26 प्राणी कोरोना विषाणू संक्रमणास बळी पडण्यास अतिशय संवेदनशील आहेत. सीएनएनने अहवालात म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये काही शेतकरी आजारी पडल्यानंतर मिंकमध्ये कोरोना विषाणूची घटना प्रथमच समोर आली होती. मात्र, विषाणूची लागण झाल्यानंतर शेतातील तीन कामगार बरे झाले होते. इतर देशांच्या क्षेत्रातही अशी प्रकरणे उघडकीस आली आहेत. नेदरलँड्स, स्पेन आणि डेन्मार्कमध्ये इतर प्रकरणे आढळून आल्याची माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने दिली आहे. संशोधनात असे आढळले आहे की, बहुतेक पक्षी, मासे आणि साप यांना संसर्ग होण्याचा धोका नाही.