Visuals from the locality where the attack was reported in Vienna | (Photo Credits: Twitter)

Vienna Terror Attack: ऑस्ट्रियामधील (Austria) व्हिएन्ना (Vienna) शहरात 6 वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. डेली मेलच्या वृत्तानुसार, या दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) हल्लेखोरांसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. व्हिएन्ना पोलिस विभागाच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात बरेच लोक जखमी झाले आहेत. व्हिएन्ना पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये असे सांगण्यात आले की, सोमवारी रात्री आठ वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली. शहरातील 6 वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबारच्या घटना घडल्या. या घटनेत एका अधिकाऱ्यासह अनेक लोक जखमी झाले आहेत. याव्यतिरिक्त, पोलिस अधिकाऱ्यांनी संशयित हल्लेखोरला गोळ्या घालून ठार केलं. दुसर्‍या ट्विटमध्ये व्हिएन्ना पोलिसांनी लोकांना या हल्ल्याबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्याबरोबरच पोलिसांनी अफवांपासून दूर राहण्यासदेखील सांगितले आहे. पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "कृपया कोणत्याही अफवा, आरोप, अनुमान किंवा बळी पडलेल्यांची पुष्टी न झालेल्यांची संख्या पाहू नका. यामुळे कोणत्याही प्रकारे मदत होणार नाही! घरात रहा! आश्रय घ्या, सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा." (हेही वाचा - Ireland: आयर्लंडची राजधानी डबलिनमध्ये घरात आढळले भारतीय महिलेसह तिच्या 2 मुलांचे मृतदेह; पोलिसांनी वर्तवला हत्येचा संशय)

दरम्यान, सशस्त्र संशयितांपैकी एक सभास्थानातून बाहेर पडताना दिसला. हल्लेखोरांनी पळून जाण्यापूर्वी गोळीबारदेखील केला. ऑस्ट्रियाचे आंतरिक व्यवहार मंत्री कार्ल नेहमेर यांनी सांगितले की, मध्य व्हिएन्नामधील एका प्रमुख सभास्थानाजवळ झालेला गोळीबार हा दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच आहे.

बाधित भागातील लोकांना घरातचं राहण्यास सांगण्यात आले आहे. यासह त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांनी एक लिंक शेअर केली आहे. ज्यात पोलिसांनी नागरिकांना संबंधित घटनेचे व्हिडिओ आणि फोटो पाठवण्याचे आवाहन केले आहे. सध्या या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.