Ireland: आयर्लंडची राजधानी डबलिन (Dublin) मध्ये एका भारतीय महिलेची आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह सापडली आहेत. ही महिला कर्नाटकातील म्हैसूरची असून ती सात महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत डबलिनला गेली होती. ही घटना दक्षिण डब्लिनमध्ये घडली. 28 ऑक्टोबर रोजी ही महिला आपल्या दोन मुलांसह घरात मृत अवस्थेत आढळली. दक्षिण डबलिनमधील पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेचे नाव सीमा बानू असं आहे. तसेच तिच्या 12 वर्षांच्या मुलीच नाव असफिरा असून 6 वर्षाच्या मुलाचं नाव फैजान सय्यद असं आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, या तिघांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास हत्येच्या अॅग्लने केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब कर्नाटकच्या म्हैसूरमधील एका खेड्यातील आहे.
आयरिश टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या ठिकाणी हे कुटुंब राहत होतं, त्याठिकाणच्या शेजार्यांनी या कुटुंबातील सदस्यांना बऱ्याच दिवसांपासून पाहिलं नव्हते. तसेच त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता म्हणून स्थानिक लोकांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडला. यावेळी पोलिसांना घरात महिलेचा मृतदेह एका वेगळ्या खोलीत पडलेला दिसला. तसेच मुलांचा मृतदेह दुसर्या खोलीत आढळून आला. (हेही वाचा - Bengaluru: 24 हजार रुपयांचे भाडे न मिळल्याने महिलेकडून भाडेकरुवर चाकू हल्ला)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील एक नळ चालू होता. त्यामुळे रुममध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून या महिलेचा आणि तिच्या दोन मुलांचा मृतदेह घरातचं पडला होता. (हेही वाचा - Uttar Pradesh Crime: पती तुरुंगात गेल्यानंतर पत्नीचे दीरासोबत जुळले प्रेमसंबंध; 3 वर्षाने जामिनावर सुटून आल्यानंतर मोठ्या भावाची केली हत्या)
दरम्यान, स्थानिक पोलिसांनी महिलेच्या पतीशी संपर्क साधला असून या तिघाचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. आयरिश टाईम्सच्या वृत्तानुसार, मुलांचा गळा दाबून खून करण्यात आला असून महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महिलेच्या शरीरावर काही खूणा आढळल्या आहेत. या कुटुंबाच्या नातेवाईकांनी आयर्लंड सरकारकडे मृतदेह भारतात पाठवा, अशी मागणी केली आहे.