Sri Lanka Serial Bomb Blasts: न्यूझीलंड येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेत बॉम्बस्फोट; ISIS ने स्वीकारली जबाबदारी
Islamic State Flag | Representation Image | (Photo Credit: Wikimedia commons)

नुकत्याच श्रीलंका (Sri Lanka) येथे झालेल्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण जग हादरले आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो (Colombo) येथे झालेल्या 8 साखळी बॉम्बस्फोटामध्ये तब्बल 290 लोक मारले गेले तर 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. श्रीलंकेसारख्या संवेदनशील देशात अशी घटना घडल्याने संपूर्ण जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. यामागे नक्की काय कारण असावे आणि कोणाचा हात असावा याचा अंदाज लावला गेला आहे. या स्फोटाचा संबंध न्यूझीलंड (New Zealand) येथे झालेल्या हल्ल्याशी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटना आयएसआयएस (ISIS) या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

न्युझीलंडमधील मशिदीत झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी कोलंबो येथे बॉम्बस्फोट केल्याचे, भारताचे माजी राजनैतिक अधिकारी जी. पार्थसारथी यांनी म्हटले आहे. तसेच श्रीलंकेचे संरक्षणमंत्री रुवान विजेवार्देन (Ruwan Wijewardene) यांनी संसदेला माहिती देण्यासाठी केलेल्या भाषणामध्ये, हा हल्ला न्यूझीलंड येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केला गेला असल्याचे सांगितले आहे. तसेच या आत्मघातकी हल्ल्यामागे ‘नॅशनल तौहीद जमात’ (NTJ) या कुख्यात कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात होते, मात्र यामागे आयएसआयएसचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. (हेही वाचा: आज रात्रीपासून देशात आणीबाणी लागू)

श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांनी यासाठी मदत केल्याचे सांगितले आहे. दरम्यान, 21 एप्रिल रोजी, ईस्टर सणाच्या दिवशी कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये, पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये, शांगरी ला हॉटेल (Shangri-La Hotel) आणि किंग्जबरी हॉटेल अशा महत्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट झाले आहेत. सध्या देशात आणीबाणी लागू असून, पोलिसांनी आतापर्यंत 40 लोकांना अटक केली आहे.