Sri Lanka Blast: आज रात्रीपासून देशात आणीबाणी लागू; स्फोटात JDS च्या दोन सदस्यांचा मृत्यू तर 5 जण बेपत्ता
श्रीलंका बॉम्बस्फोट (Photo Credits: IANS)

रविवार 21 एप्रिल रोजी संपूर्ण जगाला हादरवून टाकणारी घटना श्रीलंकेची राजधानी कोलंबो (Colombo) येथे घडली. चर्च, हॉटेल्स अशा ठिकाणी 8 साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात तब्बल 290 लोक मारले गेले असून, 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज (सोमवार, 22 एप्रिल) मध्यरात्रीपासून देशात आणीबाणी (Nationwide Emergency) लागू केली जाणार आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना (Maithripala Sirisena) यांनी याबाबत घोषणा केली. स्थानिक मुस्लिम संघटना ‘नॅशनल तौहीद जमात’ने हा हल्ला केल्याचे सरकारी प्रवक्ते राजीथा सेनारत्ने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

काल सकाळी ईस्टर सणानिमित चर्चमध्ये अनेक लोक प्रार्थनेसाठी जमले होते. ही संधी साधून बॉम्बस्फोटाचे सत्र रंगले, यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटात जगभरातील 35 देशातील नागरिकांचा समावेश आहे. या प्रकरणी आतापर्यंत 24 लोकांना अटक करण्यात आली आहे, तर कालपासून श्रीलंकेत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये, पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये, शांगरी ला हॉटेल (Shangri-La Hotel) आणि किंग्जबरी हॉटेल अशा महत्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट झाले आहे. स्फोटानंतर चालू असलेल्या तपासणीदरम्यान कोलंबोच्या मुख्य बस स्टँडवर पोलिसांना 87 बॉम्ब डिटोनेटर सापडले असल्याची माहिती मिळाली आहे. (हेही वाचा: लंका मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पॅरिस मधील Eiffel Tower वरील रोषणाई बंद)

या स्फोटात कर्नाटकमधल्या जनता दल सेक्युलर या पक्षाच्या दोन सदस्यांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण बेपत्ता आहेत. भारताकडून मदत म्हणून एअर इंडियाने 24 एप्रिलपर्यंत कोलंबोहून येणारी-जाणारी तिकीटं रद्द किंवा रिशेड्यूल केल्यास त्यावर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या सागरी सीमांवर हाय अलर्ट घोषित केला आहे.