ऑफिसमधून सुट्टी घेण्यासाठी आपण सर्वांनीच कधी ना कधी खोटे बोलले असेल. मात्र आपण कधी ऐकले आहे का, की एखादी व्यक्ती त्याच्या सुट्टीसाठी अनेक वेळा लग्न करू शकतो? नक्कीच नाही. मात्र अशी घटना घडली आहे तैवानमध्ये (Taiwan) येथे, एका व्यक्तीने आपली पगारी रजा (Paid Leave) वाढवण्यासाठी एकाच मुलीशी 4 वेळा विवाह केला आहे. यासाठी त्याला त्या मुलीशी 3 वेळा घटस्फोटही घ्यावा लागला. अवघ्या 37 दिवसांत हे सर्व घडले आहे. ही व्यक्ती एका बँकेत क्लर्क म्हणून काम करत आहे.
वृत्तानुसार, जेव्हा त्या व्यक्तीने लग्नासाठी रजा मागितली तेव्हा केवळ 8 दिवसांचीच रजा मंजूर झाली. 6 एप्रिल 2020 रोजी त्याचे लग्न झाले आणि पुढे काही दिवसांनी सुटी संपली. या व्यक्तीला आपली सुट्टी अजून वाढवायची होती म्हणून त्याने शक्कल लढवली. त्यानंतर या व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन पुन्हा तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने कायदे व नियमांचा उल्लेख करून पुन्हा रजेसाठी अर्ज केला. असे त्याने सलग चार वेळा केले आणि तीन वेळा घटस्फोट घेतला. एकूण त्याने चार लग्नांसाठी सुमारे 32 दिवसांची सुट्टी घेतली. (हेही वाचा: इंग्लंडमधील संगीत अभ्यासक्रमात 'मुन्नी बदनाम हुई' गाण्याचा समावेश)
तो नक्की काय करण्याचा प्रयत्न करीत आहे हे बँकेच्या लक्षात आले आणि त्यांनी पगारी रजा देण्यास नकार दिला. महत्वाचे म्हणजे बँकेने रजा नामंजूर करूनही या व्यक्तीने चार वेळा लग्न आणि तीन वेळा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा बँकेने पगारी रजेबाबत नकार दिला, तेव्हा त्या व्यक्तीने नियोक्ताविरूद्ध ताइपे शहर कामगार ब्युरोकडे तक्रार दाखल केली. बँक कामगार रजा नियमांच्या कलम 2 चे पालन करत नसल्याचा आणि कायदा मोडत असल्याचा आरोप केला. कायद्यानुसार कर्मचार्यांना लग्नाच्या वेळी 8 दिवसाची पगार रजा मिळणे आवश्यक आहे. कारकुनाचे 4 वेळा वेळा लग्न झाले असल्याने, त्याला 32 दिवसांची पगाराची रजा मिळायला हवी, असे त्याने म्हटले आहे.