इंग्लंडमधील संगीत अभ्यासक्रमात 'मुन्नी बदनाम हुई' गाण्याचा समावेश
Munni Badnam Hu Song (Photo Credits: Youtube)

अभ्यासक्रमात बॉलिवूडचं गाणं. हा काही मेळ बसत नाही. हे ऐकूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. परंतु, इंग्लंडमधील डिपार्टमेंट फॉर एज्युकेशनने (डीएफई) सुरु केलेल्या नवीन संगीत अभ्यासक्रमात बॉलिवूडचं 'मुन्नी बदनाम हुई' (Munni Badnaam Hui) गाणं समाविष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी किशोरी अमोणकर (Kishori Amonkar) यांचे ‘सहेला रे’,अनुष्का शंकरचे (Anoushka Shankar) ‘इंडियन समर’(Indian Summer), ए.आर. रहमान (AR Rahman) यांचे ‘जय हो’ (Jai Ho) या भारतीय गाण्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता.

जगभरातील संगीतातील वैविध्य समजून घेण्यासाठी डीएफईमध्ये विशेष अभ्यासक्रम चालवला जातो. विशेष म्हणजे इंग्लंडच्या संगीत क्षेत्रातील शिक्षक, संगीतकार आणि अभ्यासकांच्या 15 जणांच्या पॅनलने मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे. डीएफईने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 'मुन्नी बदनाम हुई' हे बॉलिवूड सिनेमातील आयटम नंबर आहे. अशा गाण्यांचा सिनेमाच्या कथानकाशी थेट संबं नसतो. परंतु, गाण्याचे चित्रीकरण आणि चालीतील सांगितिक वैशिष्ट्य यामुळे या गाण्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. तसंच या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रॅक्टिकल पद्धतीचा वापर केला जातो. प्रत्येक इयत्तेत शिकवणं सोप्पं जावं यासाठीही संस्था प्रयत्नशील असते.

2010 मध्ये आलेल्या 'दबंग' या सिनेमातील  हे हिट गाणं आहे. मलायका अरोरावर चित्रीत या गाण्यात सलमान खान तिच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. तसंच या गाण्यात अभिनेता सोनू सूद देखील आहे. या गाण्यासाठी गायिका ममता शर्माला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. तर संगीतकार साजिद-वाजिद यांना बेस्ट म्युझिक डायरेक्टरचा फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.