'या' देशात बाळाच्या जन्मानंतर सरकार देते अधिक पगारासह भरगोस सुविधा
Representational Image (Photo Credits: Facebook)

विवाहीत जोडप्याच्या आयुष्यात बाळाचे आगमन होणे, हा अतिशय आनंददायी क्षण आहे. पण या आनंदासोबतच आयुष्यभरासाठी जबाबदारीही पदरी पडते. पण एक देश असा आहे की, जिथे मुलांच्या जन्मानंतरची जबाबदारी उचलण्यासाठी खुद्द सरकार नागरिकांना मदत करते. या देशात वर्किंग कपलला (Working Couples) दोनपेक्षा अधिक मुले असल्यास अधिक पगार दिला जातो. इतकंच नाही तर सरकारकडून खास सुविधा दिल्या जातात. या सुविधा मुलं होण्यापूर्वीपासून मुलांच्या जन्मापर्यंत पालकांना मिळत राहतात. हा आगळावेगळा देश आहे स्वीडन  (Sweden).

स्वीडनमध्ये गर्भवती महिलांना प्रीनॅटल केअर (Prenatal Care) मोफत दिली जाते. अधिकतर हॉस्पिटलमध्ये हॉटेल्स असतात. तिथे प्रग्नेंसीनंतर महिलांसोबत त्यांच्या पार्टनरला राहण्याची सोय असते.

पगारासोबत मिळते मोठी सुट्टी

या देशात बाळाच्या जन्मानंतर आई-वडील दोघेही पालकत्व रजा (Parental Leave) घेऊ शकतात. येथे 480 दिवसांची मोठी सुट्टी पालकांना देण्यात येते. त्याचबरोबर बाळाच्या जन्माच्या सुमारे 60 दिवस आधी गर्भवती महिलेला सुट्टी घेण्याचा अधिकार आहे. एकूण सुट्ट्यांपैकी 390 सुट्ट्यांच्या पगारातील 80% पगार कपलला मिळतो. तर 90 दिवसांच्या सुट्ट्यांचा पूर्ण पगार दिला जातो.

विशेष म्हणजे बेरोजगार लोकांना देखील बाळाच्या जन्मानंतर सरकारकडून ठराविक रक्कम देण्यात येते. याशिवाय बाळाच्या जन्मानंतर बाळ 8 वर्षांचे होईपर्यंत कपल्सला कामाच्या वेळेत सूट दिली जाते. कपल्स कामाच्या वेळेत 25% घट करु शकतात. मात्र पगारही त्या तासांप्रमाणेच दिला जातो.

बाळालाही मिळतो मासिक भत्ता

स्वीडनमध्ये आई-वडील दोघांनाही पालकत्व रजा मिळण्याची सोय आहे. या पेड लीव्हसोबतच सरकार बाळालाही मासिक भत्ता देते. येथे प्रत्येक मुलाला 1050 SEK च्या हिशोबाने भत्ता मिळतो आणि ही सुविधा थोडे थोडके नव्हे तर तब्बल 16 वर्षांचे होईपर्यंत दिली जाते.

विशेष म्हणजे ज्यांना अधिक मुले त्यांना अधिक सुविधा दिल्या जातात. येथे 6 मुलांच्या कुटुंबाला 6,300 SEK म्हणजे 50400 रुपयांसोबत अतिरिक्त 4,114 SEK इतके पैसे दिले जातात.

स्वीडन सरकार 6-19 वर्षांच्या मुलांना शालेय शिक्षण मोफत देते. याशिवाय 20 वर्षांपर्यंत मुलांना सर्व स्वास्थ्य सुविधा मोफत दिल्या जातात.