
जगभरात अशी अनेक प्रकरणे आहेत, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्रास देणारी किंवा अमानुष वागणूक देणारी व्यक्ती ही त्याच्या जवळचीच असते. मात्र जेव्हा अशा प्रकरणांमध्ये आई किंवा वडील दोषी आढळतात तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. युरोपियन देश स्वीडन (Sweden) मधून असेच एक प्रकरण समोर आले आहे. जेथे एका आईला अटक करण्यात आली आहे. गेल्या 28 वर्षांपासून तिने स्वत: च्या मुलाला फ्लॅटमध्ये कोडून ठेवल्याचा तिच्यावर आरोप आहे. या आईने मुलाला वयाच्या 12 व्या वर्षापासून स्टॉकहोममधील (Stockholm) फ्लॅटमध्ये कैद करून ठेवले होते, आता मुलगा 41 वर्षांचा झाला आहे.
फ्लॅटमध्ये कैद असलेल्या व्यक्तीला रविवारी नातेवाईकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. फ्लॅटमध्ये काहीतरी गडबड होत असल्याचा नातेवाईकांना संशय आला, त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला आणि पीडितेला आतून बाहेर काढले. नंतर त्यांनी डॉक्टरांना उपचारांसाठी बोलावले. स्वीडिश मीडियाच्या वृत्तानुसार, पीडित मुलगा कुपोषणाची शिकार झाला आहे. त्याच्या पायावर जखमा आढळून आल्या आहेत, तोंडात दात नाही आणि त्याला चालणे व बोलणेही शक्य नाही.
पीडित व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयाच्या वतीने पोलिसांना फोन करण्यात आला, त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आणि पीडितेच्या आईला अटक करण्यात आली आहे, तसेच मंगळवारी बंद फ्लॅटमधून अधिकाऱ्यांनी पुरावे गोळा केले आहेत. (हेही वाचा: जपानमध्ये कोरोना विषाणूपेक्षा आत्महत्येमुळे अधिक मृत्यूंची नोंद; अहवालात समोर आली धक्कादायक आकडेवारी)
माध्यमांच्या वृत्तानुसार, या महिलेने मुलाच्या 12 व्या वर्षी 1984 मध्ये मुलाचे नाव शाळेतून काढून टाकले. ही महिला आपल्या मुलाबद्दल जास्त सतर्क होती. या महिलेच्या कुटुंबात काहीतरी घटना घडली होती, त्यानंतर तिने मुलाला कैदेत ठेवण्यास सुरुवात केली. शेजार्यांचे म्हणणे आहे की, या फ्लॅटची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि आरोपी महिला मागील 30 वर्षांपासून फ्लॅटच्या खिडकीवर एक मेणबत्ती लावत आहे. शेजारी असेही म्हणाले की, महिलेने सार्वजनिक ठिकाणी लोकांशी बोलणे बंद केले होते.