Suicide In Japan: जपानमध्ये कोरोना विषाणूपेक्षा आत्महत्येमुळे अधिक मृत्यूंची नोंद; अहवालात समोर आली धक्कादायक आकडेवारी
Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

आतापर्यंत कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गामुळे जगभरात लाखो लोक मरण पावले आहेत. त्याचबरोबर या साथीच्या आजारामुळे बर्‍याच लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम झाला आहे. दरम्यान, जपान (Japan) मध्ये मृत्युच्या बाबतीत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या महिन्यात जपानमध्ये 2100 पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या (Suicide) केल्या आहेत. या आकडेवारीत पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. महत्वाचे म्हणजे जपानमध्ये कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंच्यापेक्षा गेल्या महिन्यात झालेल्या आत्महत्या अधिक आहेत. सरकारी आकडेवारीवरून याची पुष्टी करण्यात आली आहे.

जपानमध्ये ऑक्टोबर महिन्यात कोविड-19 च्या तुलनेत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जपानच्या नॅशनल पोलिस एजन्सीनुसार, देशातील मासिक आत्महत्यांची संख्या ऑक्टोबरमध्ये 2,153 नोंदविली गेली. त्याच वेळी, आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारपर्यंत जपानमध्ये कोरोनाचे एकूण 2,087 रुग्ण आढळले आहेत. जपान वेळोवेळी देशातील एकूण आत्महत्येच्या घटनांचा खुलासा करते. (हेही वाचा: चीनी शास्त्रज्ञांनी उधळली मुक्ताफळे, म्हणे कोरोना विषाणूचा जन्म 2019 च्या उन्हाळ्यात भारतात झाला)

टोकियोमधील आत्महत्यांच्या प्रकरणातील तज्ज्ञ आणि वासेदा युनिव्हर्सिटीचे सहयोगी प्राध्यापक मिचिको उएदा म्हणाले की, ‘इतर देशांच्या तुलनेत जपानमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण फार कमी आहे त्यामुळे इथे लॉकडाउन लागू करण्याची गरज नाही. कोविड-19 चा जपानवर फारसा परिणाम झाला नाही. परंतु इथल्या आत्महत्यांच्या संख्येत मोठी वाढ आहे जी चिंतेची बाब आहे.’ ऑक्टोबर महिन्यात, जपानमध्ये महिलांच्या आत्महत्या गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत जवळपास 83% वाढल्या. त्याच वेळी पुरुषांच्या आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, याआधी ऑगस्टमध्ये जपानमध्ये अंदाजे 1900 आत्महत्या झाल्या आहेत. या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत जपानमध्ये आत्महत्यांचे प्रमाण 15.3 टक्क्यांने वाढले आहे. याआधी जगभरात 'मिस शेरलॉक' (Miss Sherlock) म्हणून प्रसिद्ध असलेली जपानी अभिनेत्री Yuko Takeuchi निधनाने जपानमध्ये शोककळा पसरली होती. त्यावेळी अभिनेत्रीच्या निधनानंतर जपानमध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.