नासाच्या Perseverance Rover चे मंगळावर यशस्वी लँडिंग; प्राचीन जीवसृष्टीचा करणार अभ्यास, पहा फोटोज
NASA's Most-advanced Perseverance Rover(Photo Credits: NASA)

अमेरिकेची स्पेस एजन्सी नासा (NASA)चा पर्सिव्हरेन्स रोव्हर (Perseverance Rover) शुक्रवारी मंगळ (Mars) ग्रहाच्या पृष्ठभागावर लँड करण्यात आला. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास नासाचा रोव्हर मंगळावर उतरला. लाल ग्रहावरील रोव्हरचे पहिले छायाचित्रे नासाने शेअर केले आहे. या विशिष्ट रोव्हरने 7 महिन्यांपूर्वी पृथ्वीवरुन उड्डाण केले होते. गुरुवारी-शुक्रवारी रात्री भारतीय वेळेनुसार 2 वाजून 25 मिनिटांनी पर्सिव्हरेन्स रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागाला स्पर्श केला. या रोव्हरने लाल ग्रहाच्या पृष्ठभागावर पोहोचल्यानंतर लगेचचं नासाने पहिले चित्र आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केले. जे मंगळावरील रहस्ये उघडण्याच्या दिशेने ऐतिहासिक कामगिरी असल्याचे म्हटले जात आहे.

नासाने आपल्या ट्विटर हँडलवर मंगळाकडे जात असलेल्या रोव्हरचे छायाचित्र प्रसिद्ध केले. यासोबतचं नासाने या छायाचित्राला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, 'हॅलो वर्ल्ड, माझ्या स्वतःच्या घरातून माझा पहिला लुक.' (वाचा- Insteresting Facts Mars Mangal: मंगळ ग्रहावर किती तासांचा एक दिवस असतो? माहिती आहे का?)

अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासानेही रोव्हरच्या दुसर्‍या बाजूचे एक चित्र शेअर केले आहे. या रोव्हरच्या सहाय्याने मंगळाच्या जेजेरो क्रेटरवरील सर्व रहस्ये उलगडणे अपेक्षित आहे. या मोहिमेमध्ये नासाचा पर्सिव्हरेन्स रोव्हर लाल ग्रहावर प्राचीन जीवनाचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, पर्सिव्हरेन्स रोव्हरचे मंगळावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर नासाच्या प्रयोगशाळेत उत्सव पाहायला मिळाला.

या प्रकल्पाचे व्यवस्थापक मिमी ऑन्ग मोठ्या उत्साहाने म्हणाले की, आमच्या टीमला मंगळाचे खरे वातावरण परीक्षण करण्याची आणि सिद्ध करण्याची संधी मिळाली. आमच्या कार्यसंघासाठी यापेक्षा जास्त फायद्याचे काहीही असू शकत नाही.