South Africa Crime: एक मृतदेह लपवण्यासाठी केले 76 खून; Johannesburg येथील इमारतीला लागलेल्या आगीच्या प्रकरणात आरोपीचा धक्कादायक खुलासा
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

तारीख- 31 ऑगस्ट 2023, ठिकाण- जोहान्सबर्ग (Johannesburg), दक्षिण आफ्रिका. या ठिकाणी  अचानक रात्री उशिरा पाच मजली इमारतीला आग लागली. या आगीत 12 मुलांसह 76 जणांचा मृत्यू झाला, तर 80 जण जखमी झाले. हा अपघात इतका मोठा की याने संपूर्ण देश हादरला होता. त्यावेळी या आगीचे कारण समजू शकले नाही. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. अखेर अपघातानंतर 4 महिन्यांनी म्हणजेच 24 जानेवारी 2024 रोजी या प्रकरणाबाबत महत्वाचे अपडेट समोर आले आहे.

हा अपघात दक्षिण आफ्रिकेतील सर्वात प्राणघातक अपघातांपैकी एक समजला जातो, त्यामुळे पोलीस या प्रकरणात अव्याहतपणे तपास करत होते. पोलिसांनी 23 जानेवारीला याबाबत एका आरोपीला अटक केली. चौकशीमध्ये या व्यक्तीने आपणच ही आग लावण्याचे मान्य केले. आता या व्यक्तीवर 76 जणांची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार असून, लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाईल. (हेही वाचा: Russia Military Plane Accident: बेल्गोरोड येथे रशियाचे लष्करी विमान कोसळले, 65 कैद्यांसह 74 जणांचा मृत्यू)

आपल्या गुन्ह्याची कबुली देताना आरोपीने सांगितले की, त्याला ड्रग्जचे व्यसन होते. त्याने आपल्या ड्रग डीलरच्या सांगण्यावरून 31 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या राहत्या घरात एका व्यक्तीची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने तो मृतदेह तळघरात नेला आणि पेट्रोल ओतून पेटवून दिला. इमारतीत सुरक्षा व्यवस्था नाही हे माहित असूनही त्याने तो जळत असलेला मृतदेह तसाच सोडला आणि तिथून पळ काढला. त्यामुळे हळूहळू संपूर्ण इमारतीला आग लागली.

इमारतीच्या तळघरात लागलेली आग 5 व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी कित्येक तास लागले. आग विझवल्यानंतर मृतदेह इमारतीबाहेर काढून रस्त्यावर ठेवण्यात आले. येथून त्यांना अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. आग लागली त्या इमारतीत बहुतांश बेघर आणि गरीब लोक राहत होते. दक्षिण आफ्रिकेच्या मीडियानुसार, येथील अनेक इमारती स्थानिक गुंडांच्या ताब्यात आहेत आणि ते त्या गरीब लोकांना किंवा इतर देशांतून पळून आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना भाड्याने देतात. आरोपीने सांगितले की, या इमारतीत राहणारे लोक अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेले होते आणि ते अमली पदार्थाचा व्यापार करत होते.