Trump says 'bye-bye': अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांनी 'बाय बाय' म्हणत बैठकीतून काढता पाय घेतला. अमेरिका-मेक्सिको (US-Mexico Wall)सीमेवरील घुसखोरी थांबविण्यासाठी महाकाय भिंत बांधण्याची ट्रम्प यांची योजना आहे. या योजनेला 5.7 अब्ज अमेरिकी डॉलर इतका खर्च येणार आहे. या खर्चाला मान्यता मिळावी यासाठी डेमोक्रेटीक नेत्यांची एक महत्त्वाची बैठीक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीत या प्रकल्पासाठी निधी मिळण्यास मंजूरी मिळू शकली नाही. त्यामुळे बाय बाय म्हणत ट्रम्प यांनी बैठकीतून थेट काढता पाय घेतला. त्यानंतर या प्रकाराबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही माहिती दिली.
अमेरिका मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी ट्रम्प फारच आग्रही आहेत. त्यांच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक अशी या प्रकल्पाची ओळख आहे. त्यामुळे आपल्य कार्यकाळात हा प्रकल्प सुरु करण्यासाठी ट्रम्प प्रयत्न करत आहेत. या प्रकल्पासाठी ते इतके आग्रही आहेत की, या प्रकल्पासाठी जर निधी जमा होऊ शकला नाही. तर, देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचीही धमकी ट्रम्प यांनी दिली होती. बेकायदेशीर मार्गाने देशात घुसणाऱ्या घुसखोरांना चाप लावण्यासाठी ट्रम्प ही भिंत उभारू इच्छितात.
प्रतिनिधी सभेत ट्रम्प यांनी अध्यक्ष नेन्सी पोलोसी आणि सेनेटचे अल्पमतातील नेते चक शुमर यांना विचारले की, अंशत: बंद पडलेले सरकारी कामकाज पुन्हा एकदा सुरु केले तर आगामी 30 दिवसांमध्ये सीमेवर भिंत बांधण्यास निधी देण्यास समर्थन मिळेल काय? या प्रश्नावर पोलोसी यांनी टामपणे नकार देताच ट्रम्प नाराज झाले आणि ते बैठकीतून निघून गेले. (हेही वाचा, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पतंप्रधान इम्रान खान शिखर परिषदेसाठी इस्लामाबाद - वॉशिंग्टन यांच्यात चर्चा)
नाराज असलेल्या ट्रम्प यांनी ट्विट केले की, 'मी चक आणि नेन्सी यांच्यासोबतची बैठक आर्ध्यावर सोडून बाहेर पडलो. ही बैठक म्हणजे वेळ वाया घालवणे होते. मी विचारले की, जर कमकाज पुन्हा सुरु झाले तर, संभाव्य भिंत उभारण्यासाठी निधी द्यायला आगामी 30 दिवसांमध्ये मान्यता द्याल का? नेन्सी नाही म्हणाले. मी बैठक सोडून बाहेर पडलो. या पेक्षा अधिक काहीच करता येऊ शकत नाही.'
ट्रम्प यांचे बैठकीतून असे बाहेर पडणे हे म्हणजे अमेरिकेत राजकीय अस्थिरतेचे नवे पर्व सुरु झाल्याचे बोलले जात आहे. बैठकीतून ट्रम्प बाहेर पडल्यानंतर नेन्सी आणि शुमर यांनी पत्रकारांना सांगितले की, टेमोक्रेटिक पक्षाचे नेते काही झाले तरी, भिंत उभारण्यासाठी निधी द्यायला तयार नाहीत.