Shocking Rule by Taliban: अफगाणिस्तानमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींना शाळेत जाण्यास बंदी; तालिबानचे नवे फर्मान, विद्यार्थिनींना तिसरीनंतर सोडावे लागणार शिक्षण
Representative image

अफगाणिस्तानातील (Afghanistan) महिलांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तालिबान एकामागून एक कडक निर्णय लादत आहे व त्यामुळे महिलांना देशात जगणे अवघड होत आहे. आता तालिबानकडून 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींना शाळेत जाता येणार नाही असा नवा फर्मान जारी करण्यात आला आहे. बीबीसी पर्शियनचा हवाला देत एनडीटीव्हीने याबाबत एक वृत्त लिहिले आहे, ज्यात असे म्हटले आहे की, अफगाणिस्तानच्या काही प्रांतांमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींना शाळेत जाण्यास मनाई केली जात आहे. म्हणजेच मुली तिसरीच्या पुढे शिक्षण घेऊ शकणार नाहीत.

अहवालात पुढे म्हटले आहे की, अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात, शिक्षण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी शाळा आणि प्रशिक्षण केंद्रांना 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींच्या प्राथमिक शाळेत प्रवेशावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. येथे धार्मिक शिक्षण आणि मार्गदर्शन मंत्रालयाने (पूर्वीचे महिला व्यवहार मंत्रालय) अनेक राज्यांतील मुलींच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना तिसरीच्या पुढील वर्गातील सर्व मुलींना घरी पाठवण्यास सांगितले आहे. ईशान्य अफगाणिस्तानमधील सहाव्या वर्गातील विद्यार्थिनीने बीबीसीला सांगितले की, ‘त्यांना सांगण्यात आले आहे की ज्या मुली उंच आहेत आणि 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत त्यांनी शाळेत येऊ नये.’ (हेही वाचा:  'शवगृहात मृतदेह स्वच्छ करणे', 'मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेणे'; हिजाब न घालणाऱ्या महिलांना इराणमध्ये धक्कादायक शिक्षा)

याआधी उच्च शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीम यांनी आपल्या आदेशात म्हटले होते की, ‘तुम्हा सर्वांना कळविण्यात येते की पुढील सूचना मिळेपर्यंत देशातील कोणत्याही विद्यापीठात महिलांना प्रवेश दिला जाणार नाही.’ अफगाणिस्तानमध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर असलेल्या तालिबानने स्वतःला बदलण्याचे आश्वासन दिले होते, परंतु महिलांवरील अशा निर्बंधावरून ते बदलणार नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तालिबानच्या निर्णयाबाबत यूएनचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले, ‘स्त्रियांच्या शिक्षणाशिवाय आणि सहभागाशिवाय देशाचा विकास कसा होईल याची कल्पना करणे कठीण आहे.’

तालिबान सरकारच्या निर्णयावर जगभरातून होत असलेल्या टीकेबाबत अफगाणिस्तानच्या उच्च शिक्षण मंत्री, निदा मोहम्मद नदीम यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाले की, ‘ही अफगाणिस्तानची खाजगी बाब आहे आणि इतर देशांनी त्यात हस्तक्षेप करू नये.’ ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तालिबानने महिलांवर सर्व प्रकारच्या बंदी लादल्या आहेत. णा महिलांना उच्च शिक्षण घेता येत आहे, ना त्यांना नोकरी करता येत नाही.