Sex Cult Leader: इस्लामिक धर्मोपदेशक Adnan Oktar ला 8,658 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; घरावरील छाप्यात सापडल्या 69,000 गर्भनिरोधक गोळ्या, जाणून घ्या गुन्हे
Adnan Oktar (संग्रहित संपादित प्रतिमा)

तुर्की (Turkey) न्यायालयाने इस्लामिक धर्मोपदेशक अदनान ओक्तारला (Adnan Oktar) 8658 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इस्तंबूलच्या उच्च फौजदारी न्यायालयाने बुधवारी (16 नोव्हेंबर 2022) त्याला ही शिक्षा सुनावली. त्याला दहशतवादी संघटना चालवणे, लैंगिक शोषण, अल्पवयीन मुलींवर बलात्कार, ब्लॅकमेल, मनी लाँड्रिंग आणि हेरगिरी यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. तो ऑनलाइन A9 टीव्ही चॅनलवर इस्लामिक प्रवचन देत असे. टीव्हीवर कट्टरपंथीयांचे धडे देणारा ओक्तार आपली स्टाईल, आधुनिक कपडे आणि सतत महिलांच्या गराड्यात असल्याने चर्चेत होता. त्याच्या जवळपास 1000 गर्लफ्रेंड असल्याचे कोर्टात सांगण्यात आले.

बातम्यांनुसार, जेव्हा ओक्तार टीव्हीवर कट्टरपंथीचे धडे देत होते, तेव्हा त्याच्याभोवती तोकड्या कपड्यांमध्ये महिला उपस्थित असत. या महिलांना तो 'मांजरीचे पिल्लू' म्हणत असे. त्याच्या या शोवर बरीच टीकाही झाली होती. त्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तो महिलांसोबत डान्स करताना दिसत आहे.

आता न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपी अदनान म्हणाला, ‘आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. आमचा आमच्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. या निर्णयामुळे आम्ही आनंदी आहोत. हा अल्लाहचा निर्णय आहे. आपल्या आयुष्यात चांगले दिवस येतात. इस्लाम संपूर्ण जगावर राज्य करेल. तुर्की एक सुंदर देश असेल. हा निर्णय फायदेशीर ठरू शकतो.’ या इस्लामिक टीव्ही उपदेशकाच्या संकेतस्थळावरून असे दिसून येते की त्याने 300 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांचे 73 भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

गेल्या वर्षी, 66 वर्षीय अदनान ओक्तारला लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि राजकीय आणि लष्करी हेरगिरी यासह गुन्ह्यांसाठी 1,075 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इतर 236 लोकांवर अदनान आणि त्याच्या संघटनेचे सदस्य असल्याचा आरोप होता, परंतु हा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला. तसेच याआधी इतर खटल्यांमध्ये ओक्तारला 891 वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु त्याने केलेल्या गुन्ह्यांची यादी इतकी मोठी आहे की त्याची शिक्षा 8658 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. (हेही वाचा: ऐकावे ते नवलंच! 70 वर्षांच्या वृद्धाचा 19 वर्षीय तरुणीशी विवाह; Pakistan मधील लग्नाची सोशल मिडियावर चर्चा)

2018 मध्ये, इस्तंबूलच्या पोलीस क्राईम युनिटने अदनान ओक्तारच्या व्हिलावर छापा टाकला आणि त्याला शेकडो समर्थकांसह अटक केली. छाप्यादरम्यान, पोलिसांना कळले की तो इस्लामिक धर्मोपदेशक म्हणून एक गुन्हेगारी टोळी चालवतो. याशिवाय पोलिसांना त्याच्या घरात सुमारे 69000 गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या होत्या.