ऐकावे ते नवलंच! 70 वर्षांच्या वृद्धाचा 19 वर्षीय तरुणीशी विवाह; Pakistan मधील लग्नाची सोशल मिडियावर चर्चा (Watch Video)
Liaquat and Shumaila (संग्रहित संपादित प्रतिमा)

पाकिस्तानच्या (Pakistan) लाहोरमधील (Lahor) एक विवाह सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. येथे लियाकत नावाच्या 70 वर्षीय व्यक्तीचा 19 वर्षीय शुमाइलासोबत विवाह झाला आहे. यूट्यूबर सय्यद बासित अलीने या दोघांची प्रेमकथा यूट्यूबवर शेअर केली आहे. सय्यद बासित यांच्याशी बोलताना लियाकत आणि शुमाईलाने सांगितले की, ते दोघे मॉर्निंग वॉक दरम्यान भेटले होते जिथे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. लियाकतचा दावा आहे की शुमाइला त्याच्या गाण्यावर मोहित झाली होती.

सय्यद बासित अली नावाच्या वाहिनीवर 14 जून 2022 रोजी या मियाँ-बीवीची मुलाखत प्रदर्शित झाली आहे. सुमारे 6 महिन्यांपूर्वी झालेल्या या मुलाखतीत लियाकत आणि शुमाइला यांनी अतिशय रोमँटिक शैलीत पोझ दिली आहे. तसेच प्रश्नांची उत्तरेही बिनधास्तपणे दिली आहेत. शुमाईलाने आपण या नात्यामुळे खूप आनंदी असल्याचे सांगितले. शुमाईलाने सांगितले की, ते दोघे अनेक दिवस सकाळी फिरायला जात होते. एके दिवशी शुमाईला फिरायला गेली असताना 70 वर्षांचे लियाकत तिच्या मागे गाणे गुणगुणत होते.

त्यानंतर ती त्यांच्या गाण्याच्या प्रेमात पडली. पुढे ते रोज एकमेकांना भेटू लागले. मग एक दिवस दोघांनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. शमाईला म्हणाली की, प्रेमात वय पहिले जात नाही, ते फक्त घडते. यात जात-पात, उच्च-नीच अशा कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. तिच्या पालकांना लग्नाला काही आक्षेप आहे का?, असे विचारले असता शुमाइलाने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी काही काळ आक्षेप घेतला पण त्यानंतर त्यांनी होकार दिला. (हेही वाचा: ऐकावं ते नवलंच! 56 वर्षीय आजीने दिला स्वतःच्या नातवाला जन्म; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या)

शुमाईला पुढे म्हणाली की, वाईट नात्यात अडकण्याऐवजी चांगल्या व्यक्तीशी लग्न केले पाहिजे. वयातील फरक बघू नये आणि वैयक्तिक प्रतिष्ठा किंवा आदर सर्वांपेक्षा वरचढ ठेवू नये. लियाकत म्हणाले की, ते 70 वर्षांचे असूनही ते मनाने खूप तरुण आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, ते आपल्या पत्नीच्या स्वयंपाकावर इतके फिदा झाले आहेत की, त्यांनी रेस्टॉरंटमध्ये खाणे सोडले आहे. या मुलाखतीवेळी लियाकत आणि शुमाईलाच्या लग्नाला चार महिने उलटून गेले होते.