Explosion at Church in Sri Lanka (Photo Credits: Twitter, @saksivarnan)

आज जगभरात ख्रिस्ती बांधव ईस्टरचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. मात्र या सणाला गालबोट लावणारी घटना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे घडली आहे. सकाळी ईस्टर संडे मासवेळी आठ साखळी बॉम्बस्फोट घडले आहेत. यातील पाच बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर उर्वरित तीन बॉम्बस्फोट पंचतारांकित हॉटेल्समध्ये झाले आहेत. सध्या मिळालेल्या मिडिया रिपोर्ट्सनुसार हे स्फोट इतके भयानक होते की, यामध्ये तब्बल 99 लोक मृत्युमुखी पडले आहेत तर 260 लोक जखमी झाले आहेत.  .

एक स्फोट कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये तर दुसरा हल्ला पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये झाला. शांगरी ला हॉटेल (Shangri-La Hotel) आणि किंग्जबरी हॉटेल (Kingsbury Hotel) मध्येसुद्धा बॉम्बस्फोट झाले आहेत. जखमींना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्यामागे आयएसआय (ISI) चा हात असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. यात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. या ठिकाणी आता सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी पहिला बॉम्बस्फोट झाला. दरम्यान, यात भारतीय नागरिक आहेत का याची माहिती घेतली जात असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. कोलंबोतील उच्चायुक्तालयाशीसुद्धा भारत संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली. श्रीलंकेतील भारतीयांसाठी +94777903082 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.