सौदी अरेबिया मध्ये Aramco  तेल कंपनीच्या 2 फॅसिलिटी सेंटरवर ड्रोन हल्ला
Fire (Photo Credits: IANS|Representational Image)

जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबिया मधील 'अरामको'(Aramco) च्या 2 फॅसिलिटी सेंटरमध्ये आज (14 सप्टेंबर) सकाळी आग लागली. ही आग या सेंटर्सवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे असल्याची माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. हे हल्ले ‘अबकॅक’ आणि ‘खुराइस’ येथील फॅसिलिटी सेंटर्सवर झाल्याची माहितीदेखील देण्यात आली आहे.

अरामको च्या फॅसिलिटी सेंटरवर भडकलेल्या आगीवार नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. अद्याप या हल्ल्यामागे कुणाचा हात आहे हे समजू शकलेले नाही. मात्र सौदी या हल्ल्याचा तपास करणार आहे. मागील महिन्यात अशाचप्रकारे अरामकोच्या नॅचरल गॅस फॅसिलीटीवरही हल्ला करण्यात आला होता. त्याची जबाबदारी येमेनच्या दहशतवादी संघटनेने घेतली होती.

दरम्यान येमेनच्या हूथी या संघटनेने सौदी अरेबियाच्या विमानतळावरदेखील क्षेपणास्त्र हल्ले केले होते. आजच्या ड्रोन हल्ल्याची मात्र अद्याप कुणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. मागील काही महिन्यांपासून आखाती देशांमध्ये तणावग्रस्त स्थिती आहे. जून महिन्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईराणवर हवाई हल्ला करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर ती त्यांनी मागेदेखिल घेतली.