Same-Sex Marriage in Thailand: थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता; ठरला आग्नेय आशियातील पहिला देश, ऑक्टोबरमध्ये पहिला लग्नसोहळा
Photo Credit - Pixabay

Same-Sex Marriage in Thailand: थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता (Same-Sex Marriage Bill Pass) मिळाली आहे. मंगळवारी 18 जून रोजी थायलंडच्या संसदेत या विधेयकावर मतदान झाले. यावेळी 152 पैकी 130 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले. तर 4 खासदारांनी विरोधात मतदान केले. 18 खासदारांनी तठस्थ भूमीका घेतली. परिणामी समलैंगिक विवाहाला (Same-Sex Marriage ) कायदेशीर मान्यता देणारा थायलंड हा आग्नेय आशियातील पहिला देश ठरला आहे. त्यामुळे LGBTQ+ समुदायाने जूनच्या अखेरीस थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक मोठी रॅली आयोजीत केली आहे. ज्यामध्ये थाई पंतप्रधान श्रेथा थाविसिन देखील उपस्थित राहणार आहेत. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा थायलंड हा आशियातील तिसरा देश ठरणार आहे. याआधी तैवान आणि नेपाळनेही याला कायदेशीर मान्यता दिली आहे. (हेही वाचा:Same-sex Marriage in Thailand: थायलंडच्या संसदेत समलिंगी विवाह विधेयक मंजूर, LGBTQ+ समुदायाचा मोठा विजय! )

20 वर्षांचा संघर्ष

थायलंडमध्ये स्वीकारार्हता आणि समावेशकतेला प्रतिष्ठा आहे. मात्र तरिही समलैंगिक विवाहांना मान्यता देणारा कायदा होण्यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष व्हावा लागला. गेल्या 20 वर्षांपासून समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी होत होती. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये हे विधेयक संसदेसमोर मांडण्यात आले होते. मात्र, विधेयक खासदारांनी फेटाळले. आता हे विधेयक मंजूर झाल्यानंतर 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती लग्न करू शकते.

विधेयकावर राजाची स्वाक्षरी बाकी

वरिष्ठ सभागृहात विधेयक मंजूर झाल्यामुळे संसदेच्या मंजूरीच्या प्रक्रीयेतील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. आता थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न यांची औपचारिक स्वाक्षरी होणे बाकी राहिले आहे. त्यांची संमती मिळाल्यानंतर, ते राजपत्रात प्रकाशित केले जाईल आणि 120 दिवसांनंतर अंमलात येईल. रिपोर्ट्सनुसार, पहिला कायदेशीर समलैंगिक विवाह थायलंडमध्ये या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

या देशांत समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता

३१ देशांच्या संविधानात समलैंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाली आहे. यात अंडोरा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, चिली, कोलंबिया, कॉस्टा रिका, क्युबा, डॅनमार्क, इक्वेडोर, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड, लिकटेंस्टाईन, लक्झेंबर्ग, माल्टा, मेक्सिको, नेपाळ, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तैवान, उरुग्वे या देशांचा समावेश आहे.

आजही येमेन, इराण, ब्रुनेई, नायजेरिया, कतार यासह जगातील १३ देशांमध्ये समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या जोडप्यांना फाशीची शिक्षा दिली जाते.

थायलंडच्या संसदेत प्राइड मंथमध्ये हा निर्णय घेण्यात आला. वास्तविक, जून महिना जगभरात प्राइड मंथ म्हणून साजरा केला जातो.

LGBTQ झेंडा बनवण्याची कहाणी

1978 मध्ये गिल्बर्ट बेकर हे समलैंगिक हक्क कार्यकर्ते आणि एका कलाकार होते. LGBTQ समुदायाच्या लोकांनी आपल्या हक्कांसाठी लढण्यासाठी ध्वजाची मागणी केली होती. त्यानंतर इंद्रधनुष्यापासून प्रेरणा घेऊन गिल्बर्ट यांनी हा ध्वज तयार केला.

इंद्रधनुष्यातील रंगांपासून त्यांना विविधतेचे महत्त्व दाखवायचे होते. 8 रंगांचा ध्वज तयार केला गेला. प्रत्येक रंग वेगवेगळ्या भावना दर्शवतो. उदाहरणार्थ, लाल रंग प्रेमाचं प्रतीक असतो. गुलाबी रंग एकमेकांची काळजी घेण्याचं काम करतो. पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक म्हणून पांढऱ्या रंगाकडे बघितलं जातं. पिवळा रंग नैराश्य दूर करण्यास मदत करतो. हिरवा रंग निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते. जांभळा रंग तुमच्या विचारात स्पष्टता आणण्यास मदत करतो. जांभाळ्या रंगाच्या फिकट छटा तुम्हाला प्रेरणा देऊन भविष्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहण्यास मदत करतात. नारंगी रंग भावनांवर ताबा मिळवून एखाद्या परिस्थितीची सकारात्मक आणि विनोदी बाजू पाहण्यास हा रंग भाग पाडतो.

जगातील समलैंगिकांची सद्यस्थिती काय?

PEW संशोधन केंद्राने, एलजीबीटीक्यू+ समुदायावर संशोधन केल्यानंतर सांगितले की, कॅनडात सर्वाधिक लोक 85% आणि US मध्ये, 72% लोक एलजीबीटीक्यू+ स्वीकारतात. मूड ऑफ नेशन सर्वेक्षणानुसार, भारतातील 62% लोक समलैंगिक विवाह स्वीकारण्यास तयार नाहीत. यावरून असे दिसून येते की समाज अजूनही एलजीबीटीक्यू+ पूर्णपणे स्वीकारू इच्छित नाही.