Ukraine-Russia War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. आज या युद्धाचा चौथा दिवस आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या अंतर्गत भागात घुसून कहर करत आहे. युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किव येथे रशियन सैन्याने गॅस पाइपलाइन उडवली. जर्मनी आणि फ्रान्सने युक्रेनला मदतीचे आश्वासन दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कीवपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर एका नदीच्या काठावर रशियन सैन्य थांबले आहे. त्याच वेळी, युक्रेनच्या सैनिकांनी शहराच्या काठावर वेढा घातला आहे.
रशियन सैन्य युक्रेनच्या अनेक भागात बॉम्बफेक करत आहे. अशा परिस्थितीत केवळ युक्रेनचेच लोक मारले जात नाहीत, तर इतर देशांतील अनेक नागरिकही बॉम्बस्फोटांना बळी पडत आहेत. या युद्धात ग्रीसचे 10 लोक मारले गेले. याप्रकरणी ग्रीसने रशियाच्या राजदूताला बोलावले आहे. (वाचा - Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूच; बुखारेस्टहून 250 भारतीयांचे दुसरे विमान पोहोचले दिल्लीला)
दरम्यान, रशिया युक्रेनवर वारंवार हल्ला करत आहे. परंतु, युक्रेननेही दावा केला आहे की, आपण 3500 रशियन सैनिक, 14 विमाने आणि 8 हेलिकॉप्टर पाडले आहेत. युक्रेनने विमान पाडल्याचे फोटोही जारी केले आहेत. शनिवारी रात्री युक्रेन आणि रशियामधील युद्ध आणखी उग्र झाले आहे.
कीवमध्ये शनिवारी काही ठिकाणी गोळीबार झाला. या युद्धात युक्रेनमधील पूल आणि इमारतींचेही नुकसान झाले आहे. युक्रेनमधील अनेक नागरिकही रशियन सैन्याविरोधात सज्ज झाले आहेत. रशियन सैन्य निरपराध लोकांवर हल्ले करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी रशियाने दावा केला आहे की, ते केवळ लष्करी तळांना लक्ष्य करत आहेत.
Ukraine says Russian forces blew up gas pipeline in Kharkiv, country's second-largest city, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) February 27, 2022
युक्रेनमधील लोक आपली घरे सोडून इतर देशांमध्ये स्थलांतरित होत आहेत. युक्रेनमधील सुमारे 1 लाख 20 हजार लोक पोलंड, मोल्दोव्हा आणि इतर शेजारील देशांमध्ये गेले आहेत.