Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूच; बुखारेस्टहून 250 भारतीयांचे दुसरे विमान पोहोचले दिल्लीला
The second evacuation flight from Romanian (PC - ANI)

Russia-Ukraine War: रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या 250 भारतीय नागरिकांना घेऊन बुखारेस्ट (रोमानिया) येथून दुसरे विमान दिल्ली विमानतळावर पोहोचले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुखारेस्ट मार्गे युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीयांचे विमानतळावर स्वागत केले. दरम्यान, ऑपरेशन गंगा अंतर्गत तिसरे विमान बुडापेस्ट (हंगेरी) येथून 240 भारतीय नागरिकांना घेऊन दिल्लीला रवाना झाले आहे.

केंद्रीय मंत्री सिंधिया म्हणाले, "आम्ही अनेक मुलांशी बोललो, त्यांनी शौर्याने आणि धैर्याने आपली जबाबदारी पार पाडली, आम्ही त्याचे कौतुक केले. त्यांना विनंती केली की, त्यांनी त्यांच्या साथीदार-मित्रांना सांगावे की, सरकारची ही मोहीम तोपर्यंत सुरू राहील. जोपर्यंत युक्रेनमधून सर्व भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणले जाईल." (वाचा -Russia Ukraine Crisis: युक्रेनहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरीच क्वारंटाईन केले जाणार, किशोरी पेडणेकर यांची माहिती)

10 हजार हून अधिक भारतीय युक्रेनमध्ये अडकले -

युक्रेनमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेला भारतीय विद्यार्थी आतिश नागर म्हणाला की, 10,000 हून अधिक भारतीय विद्यार्थी तेथे अडकले आहेत. त्यांना लवकरात लवकर भारतात आणावे अशी आमची इच्छा आहे. त्याचवेळी आणखी एका विद्यार्थ्याने सांगितले की, विद्यार्थी घाबरले आहेत. पण आम्ही ज्या शहरात राहत होतो (रोमानिया सीमेजवळ) तेथील परिस्थिती युक्रेनच्या इतर प्रदेशांपेक्षा खूपच चांगली आहे.

दरम्यान, एअर इंडियाच्या विशेष विमानाने विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या केबिन क्रू प्रभारी रजनी पॉल म्हणाल्या, “भारतीयांना त्यांच्या घरी परत नेण्याच्या या ऑपरेशनचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. काही विद्यार्थी पिकअप पॉईंटवर पोहोचण्यासाठी त्यांचे सामान घेऊन जात आहेत. काही भारतीय 9-10 किलोमीटर पायी आले आहेत."

मुंबई विमानतळावर शनिवारी पोहोचले पहिले विमान -

रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून आलेले पहिले विमान सायंकाळी 7.50 च्या सुमारास मुंबई विमानतळावर पोहोचले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी संकटग्रस्त युक्रेनमधून परतलेल्यांचे स्वागत केले. युद्धग्रस्त युक्रेनमधून आपल्या लोकांना परत आणण्यासाठी भारताने आपली मोहीम तीव्र केली आहे. युक्रेनमधील भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या लोकांना शेजारील देशांमध्ये नेण्यात अनेक अडचणी येत असल्याचे वृत्त आहे. युक्रेनमध्ये सध्या सुमारे 16,000 भारतीय अडकले आहेत.