
रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) संघर्ष गंभीर होत चालला होता. युक्रेनच्या लष्कराचे कमांडर-इन-चीफ व्हॅलेरी झालुझानी यांनी दावा केला आहे की 25 रशियन सैनिकांनी युक्रेनच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. रशियन सैन्याच्या 30 टाक्या नष्ट करण्याबरोबरच 7 विमाने आणि 6 हेलिकॉप्टर पाडण्यात आले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की त्यांच्या सैन्याने 800 रशियन सैनिक मारले आहेत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी दावा केला आहे की रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात 137 युक्रेनियन ठार झाले आहेत. यासोबतच 316 जण जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. रशियन सैन्याशी लढण्यासाठी युक्रेन सैन्याला एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. या लढतीत एकटे पडल्याचे युक्रेनकडून यापूर्वी सांगण्यात आले होते. युक्रेनने लष्कराला पाठिंबा देण्यासाठी आपल्या नागरिकांना 10,000 असॉल्ट रायफल्स देखील वितरित केल्या आहेत.
युक्रेनने रशियाविरुद्ध मैदान-ए-जंगमध्ये देशाच्या नागरिकांना सामील होण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी हा निर्णय घेतला आहे. यासाठी देशातील 18 ते 60 वयोगटातील लोकांना युक्रेन सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. झेलेन्स्कीच्या अधिकृत वेबसाइटवर सामान्य नागरिकांच्या तैनातीचा आदेश प्रकाशित केला आहे.
महासत्ता असलेल्या रशियाच्या सैन्यासमोर युक्रेनचे सैन्य फारसे सामर्थ्यवान नसले तरी त्याचा आत्मविश्वास मजबूत आहे. रशिया सातत्याने बॉम्बफेक करून युक्रेनचे मोठे नुकसान करत आहे. याला प्रत्युत्तर देत युक्रेनने अनेक रशियन विमाने आणि सैनिकही पाडले आहेत. शुक्रवारी, रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या सैन्याला शस्त्रे खाली ठेवण्याचा इशारा दिला, परंतु युक्रेनने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. (हेही वाचा: What is NATO? जाणून घ्या नक्की काय आहे 'नाटो' संघटना, त्याचा उद्देश आणि सध्या किती देश आहेत सामील)
दरम्यान, युक्रेनची राजधानी कीवपासून जवळच्या इतर शहरांभोवतीचा रशियाचा वेढा घट्ट होत आहे. रशियाने कीव ताब्यात घेण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. रशियाचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी युक्रेनच्या लष्कराने एक पूल उडवून लावला आहे. या पुलाचा वापर करून रशियन लष्कर कीवमध्ये येऊ शकते, असा युक्रेनियन लष्कराचा विश्वास आहे.