Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धात भारत, अमेरिका, ब्रिटनसह जगभरातील देशांची भूमिका काय? घ्या जाणून
Russian and Ukraine flags (Photo Credits: Pxhere/Pixabay)

रशियाने (Russia) यूक्रेनवर (Ukraine) केलेल्या आक्रमनाचा जगभरातील अनेक देशांनी कठोर शब्दांमध्ये निशेध केला आहे. प्रामुख्याने पश्चिमी राष्ट्रांनी रशियाच्या या वर्तानाला विरोध दर्शवला असून, स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, रशियाचे हे वर्तन चुकीचे आहे. काही राष्ट्रांनी तर रशियावर कठोर बंधनेही घातली आहेत. संयुक्त राष्ट्र (United Nations) संघानेही रशियाने यूक्रेनसोबतचा संघर्ष (Russia-Ukraine Crisisr) लवकरात लवकर थांबवावा असे म्हटले आहे. तर भारताने मत व्यक्त करताना म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी संयम ठेवावा. आपसांतील तणाव कमी करावा. चीनने मात्र म्हटले आहे की, आम्ही रशियाची चिंता समजू शकतो. रशियाने यूक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबत जगभरातील प्रमुख देशांनी व्यक्त केलेल्या भावना खालीलप्रमाणे.

दोन्ही देशांनी शांतता बाळगावी- भारत

रशिया आणि यूक्रेन यांनी यांच्यात एकमेकांप्रती असलेला शत्रूभाव कमी नाही झाला तर तो एका मोठ्या संकटात परावर्तीत होईल. जो दोन्ही प्रदेशांतील शांतता भंग करेल, अशी भावना भारताने व्यक्त केली आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रामधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे की, 'रशिया यूक्रेन यांच्यातील संघर्ष एका मोठ्या संकटात परावर्तीत होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही देशांमध्ये घडत असलेल्या घटनांमुळे आम्ही चिंतेत आहोत. जर सावध पावले वेळीच टाकली नाहीत तर ते दोन्ही देशांना कमजोर करु शकतात.' (हेही वाचा, Ukraine-Russia Crisis: पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन यांचे अधिकारी आणि मुत्सद्दी संघ स्थानिक हितसंबंधांच्या मुद्द्यांवर नियमित संपर्क ठेवणार)

अवघे जग युक्रेनसोबत आहे- अमेरिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे की, अवघे जग यूक्रेनच्या बाजूने आहे. जगभरातील नागरिकांच्या भावना युक्रेनच्या नागरिकांच्या बाजूने आहेत. कारण त्यांना रशियाच्या युद्धखोरीला सामोरे जावे लागत आहे. बायडेन यांनी इशारा दिला आहे की, या युद्धात होणारी जीवीतहानी आणि वित्तहानीस परिणामांस केवळ रशियाच जबाबदार असेल.

रशियाचे वर्तन दुसऱ्या महायुद्धातील नाझींसारखे- यूक्रेन

यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी रशियाच्या युद्धखोर वृत्तीवर बोलताना म्हटले आहे की, रशियाचे सरकार आणि त्यांचे सैन्य हे दुसऱ्या महायुद्धातील जर्मन नाझी सैन्यासारखे वागते आहे. रशिया अत्यंत निर्भयपणे अत्यंत आत्मघातकी हल्ले करत आहे.

आम्ही रशियाची चिंता समजतो- चीन

आम्ही रशियाची चिंता समजू शकतो, असे चीनने म्हटले आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी रशियातील समकक्ष सर्गेई लावरोव यांच्यावर फोनवरुन चर्चा केली. त्यांनी म्हटले की आम्ही रशियाच्या चिंतांची जाणीव आहे. आम्ही त्या समजू शकतो. महत्त्वाचे म्हणजे रशिया यूक्रेनवर करत असलेल्या कारवाईस विरोध करण्याच चीनने नकार दिला आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्राने चीनला मानवतेच्या दृष्टीकोनातून यूक्रेनवरचे हल्ले थांबविण्याचे अवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रचे प्रमुख एंटोनियो गुतारेस यांनी म्हटले की, मला राष्ट्रपती पुतीन यांना सांगवे लागते आहे की, त्यांनी यूक्रेनमध्ये घुसवलेले सैन्य मागे घ्यावे. मानवतेच्या आधारे त्यांनी रशियाने सुरु केलेली लष्करी कारवाई मागे घ्यावी. अन्यथा त्याचे जगावर भयावह परिणाम होऊन युद्धात परिवर्तन होऊ शकते.