Ukraine-Russia War: रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. रशियन सैन्याला लवकरच राजधानी कीव ताब्यात घ्यायची आहे. रशियाचे मोठे सैन्य कीवच्या दिशेने सतत सरकत असल्याचे सॅटेलाइट फोटोंमध्ये दिसून आले आहे. या छायाचित्रांमध्ये रशियन सैन्याचा ताफा आता 64 किमी लांब झाल्याचे समोर आले आहे. कीवच्या उत्तरेला रशियन सैन्याचा मोठा ताफा आहे.
मॅक्सर टेक्नॉलॉजीने काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. छायाचित्रांद्वारे असे समजले आहे की, रशियन सैन्याच्या 64 किमी लांबीच्या ताफ्यात चिलखती वाहने, टँक, तोफखाना आणि सपोर्ट वाहनांचा समावेश आहे. रशियन लष्कराचा काफिला पूर्वी 25 किमीचा होता, तो आता 64 किमीपर्यंत वाढला आहे. यासोबतचं दक्षिण बेलारूसमध्ये सैन्य आणि हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहेत. (वाचा - 'आपल्या पाळीव कुत्र्याला सोडून मी परत येणार नाही'; युक्रेनमध्ये अडकलेल्या केरळच्या मुलीला हवी आहे Siberian Husky ला भारतात घेऊन येण्याची परवानगी)
युक्रेनने आणखी शस्त्रे मागितली -
दुसरीकडे युक्रेनने अमेरिकेकडे आणखी शस्त्रांची मागणी केली आहे. अमेरिकेतील युक्रेनच्या राजदूताने सिनेटर्सना सांगितले की, युक्रेनला रशियन आक्रमणाचा सामना करण्यासाठी अधिक लष्करी शस्त्रे आवश्यक आहेत.
दरम्यान, युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स कौन्सिल (UNHRC) ने युक्रेन संकटावर तातडीची बैठक बोलावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाच्या बाजूने 29 तर विरोधात 5 मते पडली. भारतासह 13 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. UNHRC चे एकूण 47 सदस्य आहेत.