Siberian Husky (संग्रहित संपादित प्रतिमा)

रशिया आणि युक्रेन यांच्यातील भीषण युद्धात (Russia-Ukraine War) युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे, भारत युक्रेनमधील आपल्या नागरिकांना रोमानिया, हंगेरी, पोलंड आणि स्लोव्हाकियाच्या सीमा चौक्यांमधून बाहेर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून युक्रेनमधील भारतीय नागरिकांना मायदेशी घेऊन येण्यासाठी भारताचे ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) युद्धपातळीवर सुरु आहे. अशात युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेली केरळमधील (Kerala) इडुक्की जिल्ह्यातील वैद्यकीय विद्यार्थिनी आर्या अल्ड्रिन सध्या चर्चेत आहे.

चहुबाजूला युद्धाचे सावट असताना आर्याला एकटीला मायदेशी परत यायचे नाही. तिला आपल्या सोबत आपल्या पाळीव कुत्र्यालाही घेऊन यायचे आहे. सध्या आर्या आपल्या सायबेरियन हस्की – झायरासोबत (Zairaa) रोमानियन सीमेवर थांबली आहे. आर्या, नॅशनल पिरोगोव्ह मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटी, विनितसियाची वैद्यकीय विद्यार्थिनी आहे. झायरालाही आपल्यासोबत युक्रेनमधून बाहेर काढण्याच्या फ्लाइटमध्ये परवानगी देण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांच्या परवानगीची ती वाट पाहत आहे.

तिने इडुक्कीमधील आपल्या पालकांनाही सांगितले आहे की ती, झायराशिवाय कीव्ह सोडणार नाही. 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनविरुद्ध ‘विशेष लष्करी कारवाई’ जाहीर केल्यापासून, आर्या झायराला भारतात घेऊन जाण्यासाठी कागदपत्रे तयार करत आहे. अधिकार्‍यांनी तिला बसमधून रोमानियन सीमेवर नेले तेव्हाही झायरा तिच्या मांडीवर होती. झायरासाठी अन्न सोडून तिने स्वतःचे जास्त कपडे किंवा सामान घेतले नाही. (हेही वाचा: Russia Ban Flights: रशियाने ब्रिटन आणि जर्मनीसह 36 देशांच्या विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर घातली बंदी)

आर्या म्हणते, ‘मी रोमानियन सीमेवर पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि आता मी येथे भारतीय आश्रयस्थानात आहे. माझी एकच इच्छा आहे की, अधिकाऱ्यांनी झायराला माझ्यासोबत प्रवास करण्यास परवानगी द्यावी. झायराशिवाय मी भारतामध्ये परत जाणार नाही. आर्याने झायरासाठी आश्रयाची व्यवस्था करण्यासाठी युक्रेनमधील अनेक पाळीव प्राणीप्रेमींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु युद्धामुळे कोणीही झायराला सांभाळण्यास तयार झाले नाही. त्यामुळे आता झायराला आर्यासोबत भारतामध्ये येण्यास अधिकारी परवानगी देतील का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.