Luna 25 Mission (PC - Twitter/@jacksonhinklle)

Luna 25 Mission: भारतानंतर आता रशियानेही (Russia) लुनार मिशन लुना-25 (Luna 25 Mission) लाँच केले आहे. रशियाने 47 वर्षांनंतर चंद्रावर लँडर पाठवले आहे. मॉस्कोपासून 5500 किमी पूर्वेस असलेल्या अमूर ओब्लास्टच्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम येथून लुना 25 लाँच करण्यात आले. भारताच्या चांद्रयान-3 च्या आधी रशियाचे लुना-25 चंद्रावर पाऊल ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.

रशियन मीडियानुसार, शुक्रवारी, 11 ऑगस्ट रोजी पहाटे 4.40 वाजता, लुना-25 लँडर रशियाच्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम येथून प्रक्षेपित करण्यात आले. सोयुझ 2.1बी रॉकेटमधून लुना-25 चंद्रावर पाठवण्यात आले. त्याला लुना-ग्लोब मिशन असे नाव देण्यात आले आहे. रॉकेटची लांबी सुमारे 46.3 मीटर आहे, तर त्याचा व्यास 10.3 मीटर आहे. रशियाची अंतराळ संस्था रोसकोसमॉसने म्हटले आहे की, लुना-25 चंद्रावर रवाना झाले आहे. पाच दिवस ते चंद्राकडे सरकणार आहे. यानंतर 313 टन वजनाचे रॉकेट 7-10 दिवस चंद्राभोवती फिरणार आहे. 21 किंवा 22 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा - Chandrayaan-3 Misson: चंद्रयान 3 च्या प्रवासात कॅमेर्‍याने टिपले पृथ्वी, चंद्राचे फोटोज; पहा ISRO ने शेअर केलेले फोटो)

प्राप्त माहितीनुसार, रशिया चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवण्याची योजना आखत आहे. 2018 मध्ये नासाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असल्याचे सांगितले होते. Luna-25 मध्ये रोव्हर आणि लँडर आहे. त्याचे लँडर सुमारे 800 किलो आहे. Luna-25 सॉफ्ट लँडिंगचा सराव करेल. लँडरमध्ये एक विशेष उपकरण आहे, जे पृष्ठभागाच्या सहा इंच खोदकाम करेल. लुना 25 खडक आणि मातीचे नमुने गोळा करेल. त्यामुळे गोठलेल्या पाण्याचा शोध लागू शकतो. भविष्यात जेव्हाही मानव चंद्रावर तळ तयार करेल तेव्हा त्यांना पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, हा रशियाचा या मागचा उद्देश आहे.

दरम्यान, 21 किंवा 22 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी, चांद्रयान-3 भारताने 14 जुलै रोजी प्रक्षेपित केले, जे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. लुना-25 आणि चांद्रयान-3 ची लँडिंगची वेळ जवळपास सारखीच असेल. काही तास आधी लूना चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. रशियाने याआधी 1976 मध्ये लुना-24 चंद्रावर उतरवले होते. जगात आतापर्यंत झालेल्या सर्व चंद्र मोहिमा चंद्राच्या विषुववृत्तापर्यंत पोहोचल्या आहेत. पण जर Luna-25 यशस्वी ठरले, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एखाद्या देशाचे लँडर उतरण्याची ही पहिलीच वेळ असेल.