नवीन वर्ष 2023 मध्ये, आर्थिक संकट आणि मंदीची भीती (Global Recession) जगभर गडद होऊ लागली आहे. यावरून मागील वर्षांपेक्षा नवीन वर्ष आर्थिकदृष्ट्या अधिक कठीण जाणार असल्याचे दिसत आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा (IMF Chief Kristalina Georgieva) यांनी सीबीएस रविवारच्या फेस द नेशन कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणतात की, या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग या वर्षी मंदीत असेल. जॉर्जिव्हा यांनी सांगितले की, 2023 मध्ये जागतिक विकासाचे मुख्य इंजिन असलेल्या अमेरिका, युरोप आणि चीनच्या अर्थव्यवस्थांमध्ये कमकुवत होत असल्याचे दिसून येत आहे.
जगातील अमेरिका, युरोपियन युनियन आणि चीन या तिन्ही मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये मंदी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2023 च्या जागतिक विकासाचा अंदाज कमी केला आहे. रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यूएस फेडरल रिझव्र्हसारख्या केंद्रीय बँकांकडून वाढलेले व्याजदर यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. झिरो कोविड पॉलिसी नियम रद्द केल्यानंतर तसेच अर्थव्यवस्था उघडल्यानंतरही चीनमध्ये कोविड प्रकरणांच्या वाढत्या संख्येमुळे ग्राहक चिंतेत आहेत.
कोविड धोरणातील बदलानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या भाषणात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही एका नव्या युगात प्रवेश करत आहोत, ज्यासाठी अधिक प्रयत्न आणि एकजुटीची आवश्यकता असेल. आता जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे की, 40 वर्षांत प्रथमच चीनचा विकास हा जागतिक विकासाच्या बरोबरीचा किंवा कमी असू शकतो. येत्या काही महिन्यांत कोविड संसर्गाची आणखी एक लाट चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकते असेही त्यांनी सांगितले. याचा प्रादेशिक आणि जागतिक विकासावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: पाकिस्तानमधील बेरोजगारी शिगेला; अवघ्या 1,167 पदांसाठी जमले 30 हजार तरुण, चक्क स्टेडियममध्ये घ्यावी लागली परीक्षा)
ऑक्टोबरमध्ये, आयएमएफने 2022 च्या ग्लोबल आउटलुकच्या आधारे चीनचा विकास दर मागील वर्षासाठी 3.2% असण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यावेळी, चीनचा विकास दर 2023 मध्ये 4.4% पर्यंत वाढेल असेही म्हटले होते. मात्र, आता दिसून येत आहे की, चीन आणि जागतिक वाढीच्या अंदाजात आणखी कपात होऊ शकते.