हिंसाचार (संग्रहित संपादित प्रतिमा)

फ्रान्सची (France) राजधानी पॅरिससह इतर अनेक शहरांमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ (France Riots) सुरूच आहे. फ्रेंच सरकारने हिंसाचार रोखण्यासाठी अनेक नवीन पावले उचलण्याची घोषणा केली आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी या विषयावर तातडीच्या बैठकीनंतर एक संक्षिप्त निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांनी पालकांना त्यांच्या मुलांना घराबाहेर पडू देऊ नये असा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसेला प्रोत्साहन दिले जात आहे.

अहवालानुसार, मंगळवारी फ्रान्समध्ये 17 वर्षीय मुलाची पोलिसांनी जवळून गोळ्या झाडल्याने हत्या झाली होती. त्यानंतर देशात हिंसा आणि जाळपोळ सुरु झाली. मंगळवार, 27 जून रोजी, फ्रेंच पोलिसांनी नहेल एम नावाच्या 17 वर्षीय मुलाला सकाळी 9 वाजता ट्रॅफिक चेकिंग दरम्यान कार चालवत असताना गोळ्या घातल्या. फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या उपनगरातील नॅनटेरे येथे ही घटना घडली. पोलिसांनी प्रथम दावा केला की, कारच्या टायरवर गोळीबार करताना ड्रायव्हरला गोळी लागली होती, परंतु नंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस कारच्या दारातून गोळीबार करत असल्याचे दिसून आले. या घटनेने देश हादरला असून लोक प्रचंड संतापले आहेत. नाहेल एम हा अल्जेरियन वंशाचा फ्रेंच निर्वासित होता. तो टेकवे डिलिव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करत होता.

फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, एकट्या गुरुवारी रात्री रस्त्यावर जाळपोळीच्या 3,880 घटना नोंदवण्यात आल्या होत्या, त्याआधी बुधवारी रात्री जाळपोळीच्या 2,391 घटना नोंदवण्यात आल्या होत्या. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, तिसऱ्या रात्री संपूर्ण फ्रान्समध्ये हिंसाचार आणि जाळपोळ झाली आणि यावेळी 875 लोकांना अटक करण्यात आली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला.

फ्रान्समध्ये तीन दिवसांच्या हिंसाचारात 492 इमारती आणि 2,000 वाहनांना आग लावण्यात आली. आतापर्यंत शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले असून ते दुकाने, घरे, कार्यालये आणि वाहने पेटवत आहेत. आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटही झाली. वृत्तसंस्थांच्या मते, प्रचंड हिंसाचारावर मात करण्यासाठी अध्यक्ष मॅक्रॉन न डगमगता कडक सुरक्षा उपाय करण्यास तयार आहेत. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ यांनी म्हटले आहे की, पोलीस आता चिलखती वाहनांतून दंगलग्रस्त रस्त्यावर उतरतील. लोकांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी फ्रान्समधील अनेक भागात कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. अशात हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात सहभागी 249 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. पॅरिस पोलीस मुख्यालयानुसार, निदर्शने नियंत्रित करण्यासाठी सुमारे 40,000 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा: US Race-Based Admissions: यूएस कोर्टाकडून वंश आधारीत प्रवेश रद्द; कमला हॅरीस यांच्यासह अनेकांकडून टीकास्त्र, संधी नाकारण्याचाही आरोप)

गुरुवारी झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये 2024 पॅरिस ऑलिम्पिकच्या आधी निर्माणाधीन जलतरण केंद्राला आग लागली. पॅरिसच्या बाहेरील बस स्थानकाला आग लागली, ज्यात 12 बस जळून खाक झाल्या. स्थानिक मीडियामधील वृत्तानुसार, गुरुवारी रात्री कम्युनिटी सेंटर, शाळा, सिटी हॉल यांना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे की, फ्रान्समधील सध्याच्या हिंसाचारामुळे कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांनी खोलवर रुजलेल्या वर्णद्वेषाच्या मुद्द्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.