Students | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

पाकिस्तानमधील एका कोर्टाने दोन तरुणांस कठोर शिक्षा (Pakistani Court Sentences Students) ठोठावली आहे. त्यापैकी एकास मृत्यूदंड तर दुसऱ्या तरुणास जन्मठेप झाली आहे. व्हॉट्सॲप मेसेजच्या माध्यमातून ईश्वरनिंदा आणि काढलेले अनुद्गार यावरुन ही शिक्षा ठोठावण्यात आली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या या तरुणावर आरोप आहे की, त्याने मुहम्मद पैगंबर (Muhammad) आणि त्यांच्या पत्नींबद्दल अपमानास्पद मजकूर व्हॉट्सॲप मेसेजच्या माध्यमातून शेअर केला. पाकिस्तानमध्ये ईश्वरनिंदा मोठा अपराध मानला जातो.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, मुस्लिमांच्या धार्मिक भावनांचा अपमान करण्याच्या उद्देशाने फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याबद्दल दोन्ही तरुणांवर ईशनिंदेचा आरोप ठेवण्यात आला होता. 2022 मध्ये लाहोरमधील पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) सायबर क्राइम युनिटने दाखल केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाची सुरुवात झाली. एफआयए सायबर क्राईम युनिटने तक्रारीचा तपास केला आणि फिर्यादीला तीन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याचे आढळले. फिर्यादीच्या फोनची तपासणी केल्यानंतर, एजन्सीने "अश्लील सामग्री" प्रसारित केल्याची पुष्टी केली, ज्यामुळे आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

तरुणांच्या वतीने बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, विद्यार्थ्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. दोषी विद्यार्थ्याच्या वडिलांनी या निकालाविरुद्ध लाहोर उच्च न्यायालयात अपील करण्याचा विचार करत आहेत. या शिक्षेमुळे ईशनिंदा कायद्याच्या न्याय्यतेबद्दल आणि पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणाविषयी अनेक प्रश्न निर्मण झाले आहेत. पाकिस्तानमध्ये वाढलेल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निकाल आला आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये, दोन ख्रिश्चन पुरुषांवर पवित्र कुराणाची विटंबना केल्याच्या आरोपानंतर जरनवाला शहरात चर्च आणि घरे जाळण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अशा घटना पाकिस्तानमधील ईशनिंदा आरोपांचे अस्थिर स्वरूप अधोरेखित करतात. पाकिस्तानच्या कायदेशीर चौकटीत धार्मिक भावनांच्या संरक्षणासह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समतोल राखण्याची आव्हाने या शिक्षेच्या निकालपत्रादरम्यान उपस्थित करण्यात आली आहेत.

पाकिस्तानमध्ये सध्या मोठ्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. त्यात प्रामख्याने राजकीय आणि धार्मिक पातळीवरील अधिक आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोठा घटनात्मक पेचही पाकिस्तानने पाहिला. पाकिस्तानातील महत्त्वाचा तेरहरीख ए इन्साफ पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान इमरान खान यांना पाकच्या कोर्टाने दोषी आढळल्याने तुरुंगवासाची शिक्षा दिली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत खान यांच्या वतीने अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. दरम्यान, सध्या जे सरकार सत्तेत आहे ते सरकार लष्कराशी हातमिळवणी करुन सत्तेत आल्याचाआरोप केला जात आहे.