Pakistan train crash: पाकिस्तानात रेल्वेची समोरासमोर धडक; 11 ठार, 60 गंभीर जखमी
Pakistan train crash | (Photo credit: YouTube)

Pakistan train crash:  समोरासमोर आलेल्या ट्रेनची धडक होऊन झालेल्या अपघातात तब्बल 11 जण ठार तर 60 जण जखमी झाले. ही घटना पाकिस्तानातील पूर्व पंजाब प्रांतात गुरुवारी सकाळी घडली. प्राप्त माहितीनुसार, क्वेटा येथे जाणारी अकबर एक्सप्रेस या रेल्वेने पंजाब प्रांतातील सादिकाबाद तालुक्यातील वल्हर रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली आणि अपघात घडला.

पंजाब प्रांतातील वल्हर रेल्वे स्टेशनवर मालगाडी उभी होती. दरम्यान, जलदगतीने येत असलेली प्रवासी ट्रेन मुख्य मार्गावरुन धावण्याऐवजी अचानक चुकीच्या मार्गावर धावू लागली. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. स्थानिक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 3 महिलांसह आठ पुरुषांचा समावेश आहे. तर, जखमींमध्ये महिला, पुरुषांसह 11 लहान मुलांचाही समावेश आहे. (हेही वाचा, 'अमृतसर रेल्वे अपघात म्हणजे बुलेट ट्रेनच्या धुंदीत रक्ताळलेले 'अच्छे दिन')

इम्रान खान ट्विट

स्थानिक पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या अपघातात गाडीचे इंजिन पूर्णपणे नष्ट झाले आहे. तसेच, इंजिनपाठचे तीन डब्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, जखमींना सादिकाबाद आणि रहीम यार खान येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिसरात अपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे.

रेडीओ पाकिस्तान ट्विट

दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्यांप्रति राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तर, रेल्वे मंत्री शेख राशिद अहमद यांनी अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.