Pakistan Shocker: गृहपाठ न केल्यामुळे पित्याने अल्पवयीन मुलाला पेटवून केली हत्या; कराचीमधील धक्कादायक घटना
Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

पाकिस्तानच्या (Pakistan) कराची (Karachi) शहरात होमवर्क न केल्यामुळे एका पित्याने आपल्या मुलाची जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानातील इंग्रजी वृत्तपत्र डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, एका व्यक्तीला शाळेचा गृहपाठ न केल्यामुळे आपल्या अल्पवयीन मुलाला पेटवून दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, रईस अमरोवी कॉलनीत आरोपी वडील नजीर याने 12 वर्षीय मुलगा शाहीर याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी घडली.

पोलिसांनी सांगितले की, मुलगा गंभीर भाजल्यानंतर त्याला जवळच्या सिंध सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्याला कराची येथील डॉ. रुथ केएम फाऊ सिव्हिल हॉस्पिटल (CHK) च्या बर्न सेंटरमध्ये पाठवण्यात आले. बर्न सेंटरमध्ये उपचारादरम्यान शाहीरचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, मृताच्या आईच्या तक्रारीवरून वडिलांना अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला सोमवारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्राथमिक तपासादरम्यान, आरोपीने अधिकाऱ्यांना सांगितले की, आपल्या मुलाची हत्या करण्याचा त्याचा हेतू नव्हता. मुलाचा शाळेचा गृहपाठ होत नसल्याने त्याला घाबरवण्यासाठी त्याने अंगावर रॉकेल शिंपडले. आरोपीने पुढे सांगितले की, मुलाला फक्त घाबरवण्यासाठी त्याने माचिस पेटवली होती, पण इतक्यात तेलाने पेट घेतला आणि मुलाला आग लागली. (हेही वाचा: हिजाब न घातल्याने इराण पोलिसांकडून 22 वर्षीय तरुणीला बेदम मारहाण; अटकेनंतर महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, Watch Video)

दरम्यान, याआधी पतीसोबत झालेल्या भांडणातून मानसिकदृष्ट्या त्रासलेल्या आईने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाला पेटवून दिल्याची घटना घडली होती. यामध्ये लगा 50 टक्के भाजला होता. त्याला प्रथम पायल रुग्णालयात नेण्यात आले तेथून त्याला पीजीआय चंदीगडमध्ये रेफर करण्यात आले. मुलाच्या आजीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आईविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.